Join us

ते चक्क लोकल अन् बसने आले, मुख्यमंत्र्यांकडे २० लाख रुपये सोपविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 08:26 IST

आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, ना कुठली अपेक्षा ठेवली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: डोंबिवलीतून लोकलने व पुढे बसचा प्रवास करून ते मंत्रालयात आले... आणि त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दहा लाखांचे दोन धनादेश सुपुर्द केले. पंतप्रधान निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांनी २० लाखांची रक्कम समर्पित केली. सदानंद विष्णू करंदीकर असे त्यांचे नाव. करंदीकर मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथील आहेत. 

आयुष्यभराची कमाई समाजासाठी समर्पित करताना करंदीकर यांनी ना कुठला गाजावाजा केला, ना कुठली अपेक्षा ठेवली. त्यांच्या या दातृत्वाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपस्थित उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाद दिली. करंदीकर यांच्या संवेदनशीलता आणि दातृत्वाला त्यांनी नमन केले.

सदानंद करंदीकर हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांच्या पत्नी सुमती शासकीय सेवेतून निवृत्त झाल्या होत्या. हे दोघेही अपत्य नसल्याने नेरूळमधील आनंद वृद्धाश्रमात राहत असत. गतवर्षी ऑगस्टमध्ये सुमती यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. कर्करोगग्रस्तांच्या नातेवाइकांची धावपळ आणि पैशांसाठी त्यांना करावी लागणारी धडपड सदानंद करंदीकर यांनी जवळून पाहिली. त्यामुळे त्यांनी पत्नीच्या स्मरणार्थ आपल्या कमाईतील मोठा भाग समाजालाच परत करण्याचा निर्णय घेतला. म्हणूनच अध्यात्मात आणि शेतीत रस असलेले सदानंद करंदीकर यांनी मंत्रालयाकडे धाव घेतली. त्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला १० लाख आणि पंतप्रधान सहायता निधीला १० लाख असे २० लाख रुपये दिले. सदानंद करंदीकर ८२ वर्षांचे आहेत. सध्या ते बहीण प्रभा श्रीराम शितूत यांच्याकडे राहतात.

पंतप्रधान निधी वा मुख्यमंत्री निधीत रक्कम दिल्यानंतर त्याचा उपयोग गरजू लोकांसाठीच होणार हा माझा विश्वास आहे. मी दानशूर वगैरे नाही, सामाजिक बांधिलकी म्हणून मी ही रक्कम दिलेली आहे. माझ्या पत्नीला कर्करोग झाला, त्यावेळी तिला झालेल्या वेदना मला आजही आठवतात. या निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांचे दु:ख हलके झाले तर त्यासारखा दुसरा आनंद तो कोणता? - सदानंद करंदीकर.

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज्य सरकार