Join us  

दुध, कांदा, ऊस उत्पादक संकटात; सदाभाऊ खोत यांनी घेतली पियूष गोयल अन् फडणवीसांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 10:25 AM

सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे दिले आश्वासन

मुंबई: सध्या राज्यातील दूध उत्पादक, कांदा उत्पादक, ऊस उत्पादक, कापूस तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्या अनुषंगाने रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि राज्याचे उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या विविध मागण्या करण्यात आल्या. या मागण्या संदर्भात सरकार विचाराधीन असून सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे भेटीदरम्यान सांगण्यात आले. 

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :-

१) महाराष्ट्रामध्ये दूध उत्पादक मोठ्या अडचणी मध्ये आहे ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. दुधाचे प्रतिलिटर दर २५ ते २६ रुपये पर्यंत उतरले आहेत. राज्यामध्ये ४० हजार मॅट्रिक टन दुधाची भुकटी शिल्लक आहे. तरी सदर भुकटीला आणि लोणीला निर्यात अनुदान देऊन जागतिक बाजारपेठेमध्ये विक्रीस चालना द्यावी, तसेच दूध उत्पादकांना प्रतिलिटर ५ रुपये अनुदान देण्यात यावे.

२) राज्यामध्ये कांदा उत्पादक सुद्धा आंदोलन करत आहे. तरी कांद्यावरील निर्यात बंदी हटवणे गरजेचे आहे. जेणेकरून कांदा उत्पादकाला दिलासा मिळेल.

३) महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये सुद्धा असंतोष निर्माण झाला असून इथेनॉल वरील बंदीमुळे इथेनॉल निर्माण करणारे कारखाने भविष्यात आर्थिक अडचणीत सापडतील. तरी इथेनॉल वरील बंदी उठवणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. इथेनॉल निर्मिती क्षेत्रामध्ये ७० हजार कोटी पेक्षा जास्त गुंतवणूक करण्यात आलेली आहे. बंदीच्या निर्णयामुळे हा व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडेल. तरी इथेनॉल वरील बंदी उठवणे बाबत निर्णय घ्यावा. 

४) तसेच महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी सुद्धा प्रचंड अडचणीत आहे. त्यांच्या प्रश्नाकडे देखील सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे.

टॅग्स :शेतकरीसदाभाउ खोत देवेंद्र फडणवीसपीयुष गोयल