Join us  

Sachin Vaze: सुनील मानेकडील दोन गाड्या जप्त; अंधेरीतील क्राइम ब्रँच कार्यालयाची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 5:35 AM

एनआयएची कारवाई; अंधेरीतील क्राइम ब्रँच कार्यालयाची तपासणी

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटकेतील पोलीस सुनील माने कार्यरत असलेल्या अंधेरीतील सशस्त्र विभाग व क्राइम ब्रँच युनिट -११ च्या कार्यालयाची झडती घेतली. तेथील त्याच्या मालकीच्या दोन मोटारी जप्त केल्या. कारमायकल रोडवरील स्फोटक कार व ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन हत्या प्रकरणात मानेला गेल्या शुक्रवारी अटक झाली. गुन्ह्यातील त्याच्या सहभागाबद्दल सविस्तर तपास केला जात आहे.

एनआयएने सोमवारी त्याच्या मालकीची लाल रंगाची इनोव्हा व पांढऱ्या रंगाची पोलो कार जप्त केली. अंधेरीतील सशस्त्र दलाच्या (एलए) कार्यालयाच्या परिसरात त्याने या गाड्या पार्क केल्या होत्या. ३ व ४ मार्चला वाझेला भेटण्यासाठी जाताना त्याने त्या वापरल्या हाेत्या. हिरेन यांची हत्या केल्यानंतर त्यांना घेऊन वाझे व त्याचे सहकारी रेतीबंदरकडे जात असताना मानेही त्यांच्यासोबत स्वत:च्या गाडीतून गेला होता.

बदली होण्यापूर्वी तो प्रभारी असलेल्या क्राईम युनिट -११ च्या कार्यालयाची अधिकाऱ्यांनी झडती घेतली. तेथील काही पुरावे ताब्यात घेण्यासाठी ही कारवाई केल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने ३ व ४ मार्चला हिरेन यांना ज्या मोबाइल सिमकार्डवरून फोन केले होते, त्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील चौघांना अटक झाली आहे. त्यामध्ये मुख्य सूत्रधार वाझेसह एपीआय रियाजुद्दीन काझी, निरीक्षक सुनील माने व कॉन्स्टेबल विनायक शिंदे याचा समावेश आहे. तिघा अधिकाऱ्यांना अटकेनंतर निलंबित करण्यात आले आहे. तर शिंदेचे लखन भैय्या प्रकरणात पूर्वीच निलंबन झाले असून तो तुरुंगातून पॅरॉलच्या रजेवर बाहेर होता.

वाझेनेच खरेदी केले होते रुमालहिरेन यांना बेशुद्ध केल्यानंतर खाडीत टाकण्यापूर्वी त्यांच्या तोंडात रुमाल कोंबले होते. हे रुमाल वाझेने कळवा रेल्वे स्टेशनच्या बाहेरून खरेदी केले होते. वाझे रुमाल विकत घेत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज सापडले आहे. संबंधित विक्रेत्याचा जबाब नोंदविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :सचिन वाझेराष्ट्रीय तपास यंत्रणा