Join us  

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांची मराठी साहित्य संमेलनासंदर्भात वादग्रस्त पोस्ट, म्हणे...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 1:17 PM

दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर नवीन वाद निर्माण केला आहे.

मुंबई - दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट शेअर नवीन वाद निर्माण केला आहे. यावेळेस त्यांनी अखिल भारतीय मराठी  साहित्य संमेलनासंदर्भात वादग्रस्त पोस्ट फेसबुकवर शेअर केली आहे. ज्येष्ठ कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांची 92 व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. याच पार्श्वभूमीवर सचिन कुंडलकर यांनी उपहासात्मक टीका केली आहे.   

''मराठी साहित्य  संमेलनासारख्या 2000 वर्षे आऊटडेटेड आणि खर्चिक टाईमपास कार्यक्रमाला परिचयाची किंवा परिसरातील व्यक्ती अध्यक्ष म्हणून निवडून आली की केस काळे करावेत, दारू सोडावी, व्यायाम सुरू करावा, दर सहा महिन्याने तपासण्या करून घ्याव्यात . आपले वय वाढले असल्याचे भयंकर लक्षण. what the *** फिलिंग.  कारण अशा ठिकाणी आपल्यापेक्षा १९० वर्षे मोठी आणि कधीच नावे न ऐकलेली माणसे पाहायची सवय होती'', अशी फेसबुक पोस्ट त्यांनी संमेलनाच्या अध्यक्षपद निवडीवरुन अपलोड केली आहे. यामुळे आता नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  

(साहित्याला दिशा देणे हाच संमेलनाध्यपदाचा निकष हवा- अरुणा ढेरे)

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अरुणा ढेरे

दरम्यान, यवतमाळ येथे होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ कवयित्री, समीक्षक डॉ. अरुणा ढेरे यांची एकमतानं निवड करण्यात आली. निवडणुकीशिवाय संमेलनाध्यक्षपदी विराजमान होणाऱ्या डॉ. ढेरे पहिल्याच अध्यक्ष ठरल्या आहेत. यवतमाळ येथे रविवारी झालेल्या महामंडळाच्या बैठकीत घटक संस्थांकडून आलेल्या नावांवर चार तास चर्चा झाल्यानंतर एकमतानं डॉ. ढेरे यांची निवड करण्यात आली. 

(सचिन कुंडलकर यांच्या पोस्टला जितेंद्र जोशीने दिले सडेतोड उत्तर)

यापूर्वी, ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांच्या निधनानंतर त्यांचा 'मामा' म्हणून उल्लेख करत शोक व्यक्त करणाऱ्या चित्रपटसृष्टीतील कलाकारांना खडेबोल सुनावत कुंडलकर यांनी वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती.  विजय चव्हाण आजारी असताना कोणी त्यांची भेट घेण्यासाठी गेले होते का, असा सवाल करीत विजय चव्हाण यांचा उल्लेख ‘मामा’ म्हणून करत त्यांच्याशी नाते जोडू पाहणारे त्यांच्या आजारपणात कुठे होते, असा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान, सचिन कुंडलकरांच्या या प्रश्नाला कलाकार मंडळींनीही सडेतोड उत्तर दिले होते.

टॅग्स :सचिन कुंडलकर फेसबुक