Join us  

'शिवसेनेच्या राजकीय अस्ताच्या अध्यायाला आज सुरुवात', अहिरांचे ते ट्विट व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 7:10 PM

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे.

ठळक मुद्देसचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे.विशेष म्हणजे केवळ 5 महिन्यांपूर्वीच 18 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी हे ट्विट केलं आहे. 

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचेमुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री सचिन अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हातात शिवबंधन बांधत बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. मात्र, अहिरांच्या या प्रवेशानंतर राष्ट्रवादी समर्थक नाराज झाले आहेत. अहिरांना वयाच्या 27-28 व्या वर्षीच पवारांनी आमदार केलं, मंत्री केलं, मुंबईचं अध्यक्षपदही दिलं, तरी त्यांनी विश्वासघात केला, असा आरोप राष्ट्रवादी समर्थकांकडून केला जात आहे. 

सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशाने राष्ट्रवादीला मुंबईत मोठं भगदाड पडलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सचिन अहिर यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर सचिन अहिर यांनी प्रतिक्रिया दिली. शिवसेना वाढवण्याचं काम मी करणार आहे. मला असंख्य कार्यकर्त्यांचा फोन येत आहे, असे अहिर यांनी म्हटले. मात्र, राष्ट्रवादी समर्थकांकडून सचिन अहिर यांना त्यांच्या जुन्या ट्विटची आठवण करुन देण्यात येत आहे. सध्या, सोशल मीडियावर अहिर यांनी शिवसेनेवर टीका केलेलं एक ट्विट व्हायरल होत आहे. उद्धव ठाकरेंच्या गुजरात दौऱ्यावरुन अहिर यांनी ट्विट केलं होत. त्यामध्ये शिवसेनेच्या राजकीय अस्ताच्या अध्यायाला आज सुरुवात झाल्याचं अहिर यांनी म्हटलं होतं. विशेष म्हणजे केवळ 5 महिन्यांपूर्वीच 18 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी हे ट्विट केलं आहे. 

दरम्यान, आम्हाला पक्ष फोडायचा नाही, तर पक्ष वाढवायचा आहे. बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी शिवसेनेत आल्याचं सचिन अहिर यांनी सांगितलं आहे. आदित्य ठाकरेंच्या कामानं मी प्रभावित झाल्याचंही ते म्हणाले आहेत. कोणत्या जागेवरून कोणाला लढवलं पाहिजे हा निर्णय उद्धव ठाकरे घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्थान माझ्या हृदयात कायम आहे. पण. यापलीकडे जाऊन काही निर्णय घ्यावे लागतात, असे शिवसेनेत प्रवेश करण्याआधी सचिन अहिर यांनी म्हटले होते.  

टॅग्स :मुंबईराष्ट्रवादी काँग्रेससचिन अहिरशिवसेना