Join us  

वीर सावरकर उड्डाण पुलाच्या उद्घाटनाची घाई, शिवसेना-भाजपात श्रेयवादाची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2018 11:54 AM

गेली अनेक वर्षे गोरेगावकर वाहतूक कोंडी कधी सुटणार याच्या प्रतिक्षेत होते. आता, गोरेगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वीर सावरकर विस्तारित उड्डाण पुलामुळे लिंक रोडवर जाणाऱ्या वाहनांची एस. व्ही. रोड जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून

मनोहर कुंभेजकर

मुंबई- गेली अनेक वर्षे गोरेगावकर वाहतूक कोंडी कधी सुटणार याच्या प्रतिक्षेत होते. आता, गोरेगाव पूर्व व पश्चिमेला जोडणाऱ्या वीर सावरकर विस्तारित उड्डाण पुलामुळे लिंक रोडवर जाणाऱ्या वाहनांची एस. व्ही. रोड जंक्शनवर होणारी वाहतूक कोंडी कमी होणार असून, गोरेगावकरांची आता वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. इनऑर्बिट मॉल्सच्या दिशेने होणारी आणि येणारी वाहतूक आता सुरळीत होणार असून नागरिकांना पूर्वी लागतं असलेली 20 ते 25 मिनिटांची प्रतीक्षा आता कमी होईल.

गोरेगाव पूर्व व पश्चिमेला जोडणारा वीर सावरकर विस्तारित उड्डाण पूल वाहतूकीसाठी सज्ज झाला असून काम पूर्ण झाल्यावर येत्या 15 ऑगस्टला किंवा त्यानंतर लगेच या पूलाचे लोकार्पण होण्याची दाट शक्यता पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केली. अद्याप या पुलाची थोडी डागडुजी बाकी असून आज व उद्या आम्ही या पुलाची पाहणी करणार असून येत्या एक ते दोन दिवसात या पुलाच्या उद्घाटनाची तारिख जाहीर करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. राम मंदिर रेल्वे स्थानक लोकार्पण सोहळा, गेल्या 29 मार्च रोजी हार्बर रेल्वेचे गोरेगाव रेल्वे स्थानकापर्यंत विस्तारित करण्याचा समारंभ तसेच गेल्या 25 जुलै रोजी प्रभाकर पणशीकर नाट्यगृह व टोपीवाला मंडईचे भूमिपूजन या कार्यक्रमावरून शिवसेनाभाजपात श्रेयवादाची लढाई व घोषणाबाजी चांगलीच लढाई रंगली होती. त्यामुळे पुन्हा एकदा या पुलाच्या उद्घाटन सोहळ्यावरून शिवसेनाभाजपात श्रेयवादाची जोरदार लढाई, पोस्टरबाजी व घोषणाबाजी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या पूलाचे भूमिपूजन 26 जानेवारी 2015 साली मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांच्या हस्ते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, उपनगराचे पालकमंत्री व राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे, महिला व बाल कल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या भाजपा आमदार विद्या ठाकूर, तसेच काँग्रेसच्या माजी नगरसेविका स्नेहा झगडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. 15 महिन्यात सुमारे 458 मीटर लांब व 11.50 मीटर रुंद असलेल्या या विस्तारित पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या पुलाच्या कामाला तब्बल 1 वर्ष उशीर झाल्यामुळे येथील वाहतूक कोंडीतून आमची कधी सुटका होणार असा सतत सवाल गोरेगावकर करत होते. या विस्तारित पुलाच्या कामासाठी सुमारे 32.59 कोटी रुपये खर्च आला असून, आर. के. मधानी यांची कंत्राटदाताने या पुलाचे काम अखेर पूर्णत्वास नेले.

गोरेगाव येथील एस.व्ही. रोड जंक्शनवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. एस.व्ही. रोडवर होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या प्रयत्नांनी येथे वीर सावरकर उड्डाणपूल सुमारे 2000 साली बांधण्यात आला होता. या पुलाला वीर सावरकर उड्डाण पूल हे नामकरण करण्याची मागणीही देसाई यांचीच होती. मात्र, दिवसेंदिवस वाढणारी वाहनांची संख्या आणि येथे वाढणारे मोठी गृहसंकुले यामुळे येथे मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती. सुभाष देसाई हे 2004 ते 2014 पर्यंत येथील विधानसभेचे आमदार असताना त्यांच्या संकल्पनेतूनच सावरकर पुलाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच त्यांनी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. येथील पांडुरंगवाडी आणि परिसरातील नागरिकांना कर्कश वाहनांच्या हॉर्नचा त्रास होऊ नये म्हणून दक्षिण मुंबईच्या धर्तीवर या पुलावर साउंड बॅरियर लावण्याची कल्पनाही त्यांचीच होती. तसेच या विस्तारित पुलामधील मोठा अडथळा हा येथील नागरिकांच्या आड येणाऱ्या घरांचा होता. सुभाष देसाई यांनी येथील नागरिक तसेच शासन स्तरावर व पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत अनेक बैठका घेतल्या आणि येथील नागरिकांचे स्थलांतर हे राम मंदिर रेल्वे स्थानक परिसरात करण्यात आले. एस.व्ही.रोड येथे एमटीएनएल जंक्शनवर स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भव्य शिल्पदेखील सुभाष देसाई यांनी उभारले होते, याची आठवण त्यांनी करून दिली. त्यामुळे या पुलासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे मोठे योगदान असल्याचा ठाम दावा शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप शिंदे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला.

तसेच या पुलासाठी शिवसेना विधीमंडळ मुख्यप्रतोद व आमदार सुनील प्रभू हे स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते व मुंबईचे 2012 ते 2014 महापौर असतांना त्यांनी सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतील या विस्तारित पूलाचा आराखडा तयार करणे, टेंडर काढणे यासाठी सतत सहकार्य केले होते. त्यामुळे या पूलाचे सर्व श्रेय हे सुभाष देसाई व शिवसेनेचेच आहे, असा ठाम दावा दिलीप शिंदे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला असून आपण येथील नगरसेवक असताना या पुलासाठी सहकार्य केले होते अशी माहितीही त्यांनी दिली. तर या पुलासाठी स्थापत्य समिती अध्यक्ष(उपनगरे) साधना माने यांनीही हा पूल मजबूत व लवकर पूर्ण होण्यासाठी माजी मुख्य रस्ते अभियंता शितलप्रसाद कोरी व विद्यमान रस्ते अभियंता सुभाष बनसोडे यांच्याकडे बैठका घेऊन पाठपुरावा केला होता अशी माहिती दिलीप शिंदे यांनी दिली. 

तर या पुलाचे सर्व श्रेय हे भाजपाचेच असून माझे वडील दिलीप पटेल हे 1997 साली येथून नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून तसेच ते मुंबईचे उपमहापौर असतांना त्यांनी या पुलासाठी प्रयत्न केले होते. तसेच राज्याच्या महिला व बाल कल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर 2014 साली येथील आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी यासाठी पाठपुरावा केला आहे. तसेच 2017 च्या पालिका निवडणुकीत पी दक्षिण विभागातून भाजपाचे 5 नगरसेवक निवडून आले. भाजपाचे प्रभाग क्रमांक 50 चे स्थानिक नगरसेवक दीपक ठाकूर आम्ही सर्व नगरसेवकांनी हा पूल वाहतुकीसाठी लवकर सुरू झाला पाहिजे, यासाठी पालिका आयुक्त अजोय मेहता व पालिकेचे रस्ते खात्याचे व गेल्या 30 जून रोजी निवृत्त झालेले मुख्य अभियंता शितलप्रसाद कोरी व विद्यमान मुख्य रस्ते अभियंता सुभाष बनसोडे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला होता. तसेच पालिकेच्या अर्थसंकल्पीय भाषणात वीर सावरकर उड्डाण पूल व मृणाल गोरे उड्डाण पुलाचे लवकर विस्तारीकरण करण्यात यावे, अशी मागणी आपण केली होती. त्यामुळे या पुलाचे सर्व श्रेय हे भाजपाचे आहे, असा ठाम दावा आर दक्षिण वॉर्डचे प्रभाग समिती अध्यक्ष संदीप दिलीप पटेल यांनी लोकमतशी बोलताना केला आहे. येथील भाजपाचे प्रभाग क्रमांक 50 चे नगरसेवक दीपक ठाकूर यांनी सांगितले की, या पुलासाठी माझी आई व महिला व बाल कल्याण राज्यमंत्री व गोरेगावच्या स्थानिक आमदार विद्या ठाकूर या भाजपच्या नगरसेविका असतांना त्यांनी या पुलाच्या विस्तारिकरणासाठी पाठपुरावा केला होता. तसेच त्यांनी या पूलाचे काम लवकर सुरू होण्याससाठी त्यांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी या पुलासाठी एस.व्ही.रोड जंक्शनवरील वीर सावरकर शिल्पाजवळ एक दिवसाचे उपोषण केले होते. त्यामुळे या विस्तारित पुलासाठी पालिका प्रशासनाने टोकन मनी ठेवले आणि या पुलाच्या विस्तारीकरणाला पालिका प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला. विद्या ठाकूर या येथून आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी पाठपूरावा केला. 26 जानेवारी 2015 ला या पुलाचे भूमिपूजन झाले. तसेच त्यानंतर त्यांनी तब्बल 25 वेळा मिटिंग घेतल्या आणि पालिका आयुक्त अजोय मेहता यांची भेट या पुलाची पाहणी करण्यासाठी आयोजित केली. त्यामुळे या पूलाचे सर्व श्रेय हे मंत्रीमहोदय विद्या ठाकूर व भाजपाचे आहे, असा ठाम दावा नगरसेवक दीपक ठाकूर यांनी लोकमतशी बोलतांना केला आहे. या पुलाचे टेस्टिंग सुरू असून पालिकेने पुलाचे प्रमाणपत्र दिल्या नंतरच येत्या 15 ऑगस्ट किंवा नंतर लगेच होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

या ठिकाणी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे केवळ गोरेगावकरच नव्हे, तर येथून प्रवास करणाऱ्या प्रत्येक वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे पुलाची लांबी वाढवावी, अशी मागणी काँग्रेसच्या माजी नगरसेविका स्नेहा झगडे यांनी महापालिका प्रशासनाकडे केली होती. यासाठी रस्ते विभागाकडे त्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यानंतर या पुलाचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असा दावा काँग्रेसने केला आहे. त्यामुळे या पुलावरून आता शिवसेना-भाजपा आणि काँग्रेसमध्ये श्रेयवादाची लढाई रंगणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :शिवसेनाभाजपादिलीप कांबळेवाहतूक कोंडी