ग्रामीण भागातील ‘सखीं’ची कोटींची उड्डाणे
By Admin | Updated: March 8, 2015 02:27 IST2015-03-08T02:27:06+5:302015-03-08T02:27:06+5:30
हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या महिला एक पतसंस्था उभारतात व अवघ्या सात वर्षांत त्या पावणेतीन कोटींचा पल्ला गाठतात; तेव्हा नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावल्यावाचून राहात नाहीत.

ग्रामीण भागातील ‘सखीं’ची कोटींची उड्डाणे
अजय महाडिक - मुंबई
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत एका कॉर्पोरेट बॅँकेची उभारणी केली आहे. तुम्ही म्हणाल की त्यात काय मोठं; पण हायस्कूलपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या महिला एक पतसंस्था उभारतात व अवघ्या सात वर्षांत त्या पावणेतीन कोटींचा पल्ला गाठतात; तेव्हा नक्कीच अनेकांच्या भुवया उंचावल्यावाचून राहात नाहीत. महिला मंडळ, बचत गटांच्या शिदोरीवर महिलांनी महिलांसाठी उभारलेली ही आर्थिक सबलीकरणाची लढाई तालुक्यातील ६३ गावांपर्यंत पोहोचली आहे.
श्री सखी महिला पतसंस्था, भिवंडी ही ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण पट्ट्यात उभी राहिलेली महिलांची आर्थिक चळवळच! मुळात कर्ज हा विषय आला, की भिवंडीकरांना व्यापारीच काय, पण सरकारी बँकाही बहुदा नकारघंटाच वाजवतात. मॉडर्न बँकिंगच्या सांकेतिक भाषेत भिवंडी ‘ब्लॅक लिस्टेड’ म्हणून ओळखली जाते. या परिस्थितीत तालुक्यातील चूल आणि मूल संस्कृतीतील अशिक्षित आणि निराधार महिलांना व्यावसायिक कर्ज उभारणे दुरपास्तच. २००७ साली महिलांचा विकास व्हावा, या विचाराने पुढे आलेल्या ‘सखी’ने २०१४ या आर्थिक वर्षात तब्बल १,५७७ ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या आर्थिक चळवळीशी जोडले आहे.
१९९० च्या दशकात अनेक सभासदांना बुडविणाऱ्या बँका आणि फायनान्स कंपन्यांचे पेव फुटले होते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आपली मुळे घट्ट रोवणाऱ्या ‘सखी’ला सुरुवातीच्या काळात प्रतिकूलतेला तोंड द्यावे लागल्याचे पतपेढीच्या अध्यक्षा रंजना मुकादम सांगतात. ‘सखी’मुळे कुठल्याही किचकट क ागदपत्रांशिवाय ग्रामीण भागातील महिलांना ३० हजारांपासून ३ लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. सर्व महिला लघु उद्योगात यशस्वी होत असल्याचे वैजयंती थळे व शोभा पाटील या सखींनी ‘लोकमत’ला सांगितले.
अशिक्षित गुलाबचे ‘अर्थशास्त्र’
गुलाब गरुड यांनी कोणतेही पुस्तकी शिक्षण नसताना फक्त जिद्दीच्या जोरावर बॅँकिंगचे अर्थशास्त्र लक्षात घतले. आपल्या ग्रामीण आदिवासी भाषेत पुण्याच्या ‘यशदा’मध्ये आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानाद्वारे त्यांनी वेगळी छाप पाडली. अशा स्वरूपाचे व्याख्यान देणाऱ्या त्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील पहिल्या महिला ठरल्या आहेत. २०११ साली तीन दिवसांच्या सहकार प्रशिक्षणासाठी त्या पुण्याला गेल्या होत्या.
७५५ जणींनी उभारले भाग भांडवल
सात वर्षांपूर्वी जरी दुय्यम निबंधक कार्यालयाचा परवाना मिळाला असला तरी महिलांची बँक हा विषय ‘सखी’च्या सदस्यांच्या घरातील पुरुषप्रधान वातावरणात विरोधाचा विषय बनला होता. अशिक्षितपणा आणि हाताशी कुठलीही आर्थिक साधने नसताना या महिलांनी हळदी-कुंकू समारंभातून आर्थिक चळवळीचा विषय तालुक्यातील अनेक गावांपर्यंत पोहोचवला. प्रत्येकी २००, ५०० असे करीत पहिले भाग भांडवल अर्थात १ लाख रुपयांची उभारणी केली.
‘चूल आणि मूल’च्या पलीकडे
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुका तसा औद्यागिक म्हणूनच ओळखला जात असला तरी यात महिलांची ओळख अशी नाहीच. मुख्य शहराच्या जवळ असणारे पिंपळास, कोन, काटई, वेळे, चाविंद्रा, सरवली, गोवा, रांजनोली, सुरई, पाटाळे, रानाळ, चरणी पाडा, शेलार, पडघा आदी गावांतील महिला कापड उद्योगाशी जोडल्या जात आहेत.
महिलांनी महिलांसाठी एकत्र येऊन उद्योग- व्यवसायांची उभारणी करावी, यादृष्टीने ‘सखी’ व्यवस्थापनाकडून महिलांच्या प्रबोधनाचे प्रयत्न सुरू आहेत.
पतसंस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या महोत्सवातील सांस्कृतिक व्यासपीठावरून औद्यागिक मार्गदर्शनाची नवी चळवळ हाती घेत असल्याचे स्नेहा मढवी, सुचिता म्हात्रे, गुलाब गरुड व मोहना पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले