ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज
By Admin | Updated: July 14, 2015 22:57 IST2015-07-14T22:57:17+5:302015-07-14T22:57:17+5:30
शहरी भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध असते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचन साहित्य व मार्गदर्शन या बाबी मिळत नाहीत.

ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाची गरज
कुडूस : शहरी भागातील विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे मार्गदर्शन उपलब्ध असते. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाचन साहित्य व मार्गदर्शन या बाबी मिळत नाहीत. यासाठी या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबाबत चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे, असे मुंबई विद्यापीठाचे माजी उपकुलगुरू डॉ. अरुण सावंत यांनी सांगितले.
शहरी भागांत विविध माहिती देणारी वर्तमानपत्रे व पुस्तके असतात. करिअर गायडन्सचे क्लास असतात. मात्र, ग्रामीण भागात या गोष्टी नसतात, म्हणून यश सोशल गु्रपसारख्या संस्थांनी विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स व अन्य स्पर्धा परीक्षा याविषयी तज्ज्ञांची मार्गदर्शक व्याख्याने आयोजित करावीत, असे डॉ. अरुण सावंत यांनी सांगितले. केवळ शैक्षणिक डिग्री न घेता मुले आणि मुलींनी माहिती व तंत्रज्ञान यांची माहिती घ्यावी. कुडूस येथील यश सोशल गु्रपने आयोजित केलेल्या विद्यार्थी व गुणीजन गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मुंबई विद्यापीठाचे डायरेक्टर के.व्ही. हिप्पलगावकर आणि प्राचार्य वसंत हंकारे (सांगली) यांची मार्गदर्शनपर व्याख्याने आयोजित केली होती.
हंकारे यांनी सांगितले, मुलगा डॉक्टर, वकील, इंजिनीअर झाला नाही तरी चालेल, पण तो सुजाण नागरिक झाला पाहिजे. लहान मुलांवर लादली जाणारी बंधने घातक आहेत. मुलांवरील संस्कार चांगले झाले पाहिजेत. मुंबईतील युसूफ अली कॉलेजचे प्राध्यापक डॉ. के.व्ही. हिप्पळगावकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडावे. ध्येय व स्वप्न उच्च ठेवून प्रयत्न केले तर जीवनात यश नक्कीच मिळते.
यश सोशल ग्रुपच्या या कार्यक्रमातून वाडा तालुक्यातील ३० माध्यमिक, उच्च माध्यमिक व आश्रमशाळांच्या दहावी, बारावीत गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तर यूपीएससी परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करून उच्च पदावर नोकरी करणाऱ्या प्रवीण पाटील व निलेश हरड यांचा व शेतीत उत्कृष्ट प्रयोग करणाऱ्या महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कारप्राप्त अनिल पाटील व प्रयोगशील शेतकरी अल्पेश खंडागळे, बँकेत उत्कृष्ट सेवा करून मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषविणारे भगीरथ भोईर व शैक्षणिक क्षेत्रात आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त बी.के. पाटील व वैष्णवी गव्हाळे यांचा शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. कार्यक्रमासाठी मुंबई विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. अरुण सावंत, व्याख्याते के.व्ही. हिप्पळगावकर व वसंत हंकारे, पालघर जि.प. सदस्य निलेश गंधे, धनश्री चौधरी, पंचायत समिती सदस्य मेघना पाटील, नॅशनलचे संस्थापक मुस्तफा मेमन, मनसे पालघर जिल्हा उपाध्यक्ष गोविंद पाटील, पी.जे. हायस्कूलचे माजी प्राचार्य परशुराम सावंत, यश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुनील पाटील व सर्व सदस्य उपस्थित होते