रानभाज्यांची बाजारात चलती
By Admin | Updated: August 6, 2015 00:33 IST2015-08-06T00:33:21+5:302015-08-06T00:33:21+5:30
बाजारात सध्या रानभाज्यांची चलती असून कुर्डूू, करटोली, शेवळे, भारंग, ससेकांद, तेलपाट या भाज्यांनी बाजारात मुबलक उपलब्ध आहेत. ६० ते ७० रुपये किलोने मिळणारी करटोली शहरी

रानभाज्यांची बाजारात चलती
ठाणे : बाजारात सध्या रानभाज्यांची चलती असून कुर्डूू, करटोली, शेवळे, भारंग, ससेकांद, तेलपाट या भाज्यांनी बाजारात मुबलक उपलब्ध आहेत. ६० ते ७० रुपये किलोने मिळणारी करटोली शहरी भागात जास्त प्रमाणात विकली जातात. भारंग आणि शेवळे, अळू (कंद) आदी भाज्यांनाही बाजारात बऱ्यापैकी मागणी आहे. या रानभाज्या शरीराला अतिशय पौष्टिक असतात.
करटोली ही वेलीवर येणारी व कारल्यासारखी दिसणारी भाजी आहे. एका वेलीला पावसाळ्याच्या दिवसात २० ते ३० फळे लागलेली असतात. या करोटोलीची भाजी करताना त्यातील बिया काढणे गरजेचे असते. त्यामुळे भाजीला असणारा कडवटपणा कमी होतो. ही भाजी सप्टेंबरपर्यंत बाजारात मिळते. शहापूर, कसारा, वाडा-मोखाडा आदी ठिकाणच्या जंगलातून ती जिल्ह्यातील आदिवासी स्त्रिया विकावयास आणतात. या भाज्या जंगलात वाढतात. त्यामुळे त्यात कोणत्याही रासायनिक खतांचा वापर नसतो. त्यांच्यात औषधी गुणधर्म असल्याने त्या पावसाळ्यात किमान दोन ते तीन वेळा खाव्यात, असेही डॉक्टरांकडून सांगितले जाते. त्या करणेही अगदी सोपे असते. शेवळे ही भाजी पावसाळ्याच्या सुरुवातीस मिळते. काही भाज्या पावसाळा स्थिरावल्यानंतर मिळतात तर काही पावसाला निरोप देण्याच्या काळात मिळतात. या भाज्यांमधून उत्तम जीवनसत्त्वे, क्षार, पोषण द्रव्येही मिळतात. आदिवासींचे जीवन आणि अर्थकारणही या रानभाज्यांशी निगडित असते. श्रावण महिना आल्यावर अळूच्या पानांनाही तितकीच मागणी असते. नैसर्गिकत: उपलब्ध असणाऱ्या या भाज्यांची पर्यावरणीय दृष्टिकोनातून सर्वत्र लागवड करणेही गरजेचे आहे, असे पर्यावरण मंचच्या सदस्या संगीता जोशी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)