नियम मोडणा-या महाविद्यालयांची मान्यता येणार धोक्यात?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 02:40 IST2017-10-09T02:40:41+5:302017-10-09T02:40:51+5:30
मुंबई विद्यापीठांतर्गत येणा-या बहुतांश महाविद्यालयांमध्ये अनुदानित अभ्यासक्रमांसह विनाअनुदानित अभ्यासक्रमही शिकवले जातात. मात्र, बीएमएम, बीएससीआयटी, बॅफ, बीएमएससारख्या विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी नेमण्यात

नियम मोडणा-या महाविद्यालयांची मान्यता येणार धोक्यात?
मुंबई : मुंबई विद्यापीठांतर्गत येणा-या बहुतांश महाविद्यालयांमध्ये अनुदानित अभ्यासक्रमांसह विनाअनुदानित अभ्यासक्रमही शिकवले जातात. मात्र, बीएमएम, बीएससीआयटी, बॅफ, बीएमएससारख्या विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी नेमण्यात येणा-या प्राध्यापकांच्या शैक्षणिक पात्रतेच्या अटींकडे महाविद्यालये दुर्लक्ष करतात. विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर याचा थेट परिणाम होत असल्याने विद्यापीठाने अशा महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
बीएमएम, बॅफ, बीएमएस, बीएससीआयटी या अभ्यासक्रमांना विद्यार्थ्यांची अधिक पसंती मिळत असल्याने बहुतांश महाविद्यालयांमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. या अभ्यासक्रमांना अनुदान मिळत नाही. पण विद्यार्थ्यांची मागणी असल्याने विनाअनुदानित तत्त्वावर हे अभ्यासक्रम महाविद्यालयांमध्ये शिकवले जातात. मुंबई विद्यापीठांतर्गत सध्या सर्वसाधारपणे १०८ बीएमएम, १५० बीएमए, ७० बॅफ आणि १०० बँकिंग अॅण्ड इन्शुरन्स अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये आहेत. विनाअनुदानित अभ्यासक्रम शिकवणारी महाविद्यालये ही शैक्षणिक पात्रता लक्षात न घेता कमी पगारात प्राध्यापकांची नेमणूक करतात. महाविद्यालयात शिकवणाºया प्राध्यापकांसाठी पदव्युत्तर अभ्यासक्रमासह नॅशनल एलिजिब्लिटी टेस्ट (नेट) अथवा स्टेट एलिजिब्लिटी टेस्ट (सेट) उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. यूजीसीच्या नियमानुसार, प्राध्यापक जो विषय शिकवत आहे, त्याच विषयात त्याची नेट अथवा सेट परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. पण या नियमाकडे महाविद्यालय दुर्लक्ष करतात. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत आहे. त्यामुळे अशा महाविद्यालयांची मान्यता रद्द करण्यात येईल, असे परिपत्रक अलीकडेच मुंबई विद्यापीठाने काढले आहे. अनुदानित अभ्यासक्रमांसाठी महाविद्यालयांमध्ये सर्व निमयांची पूर्तता करून प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येते. पण विनाअनुदानित अभ्यासक्रमांसाठी मात्र कमी पगारात काम करणाºया प्राध्यापकांना पसंती दिली जाते.