रुईया ‘राम रंगी रंगले’

By Admin | Updated: February 3, 2015 00:29 IST2015-02-03T00:29:50+5:302015-02-03T00:29:50+5:30

भारतीय जीवनसंगीत भूपाळीपासून भैरवीपर्यंत रामकथेने व्यापलेले आहे. रामरामपासून ते शेवटचा राम म्हणेपर्यंत आपल्या जीवनातील क्षणन्क्षण कळत - नकळत रामायणमय झालेला असतो.

Ruia 'Ram Rangi Rangale' | रुईया ‘राम रंगी रंगले’

रुईया ‘राम रंगी रंगले’

संकेत सातोपे - मुंबई
भारतीय जीवनसंगीत भूपाळीपासून भैरवीपर्यंत रामकथेने व्यापलेले आहे. रामरामपासून ते शेवटचा राम म्हणेपर्यंत आपल्या जीवनातील क्षणन्क्षण कळत - नकळत रामायणमय झालेला असतो. जाती-पंथ-लिंग-भाषातीतपणे रामकथा भारतीय जीवनप्रवाहात इतकी स्वाभाविकरीत्या मिसळलेली आहे, की केवळ एका रामकथेच्या धाग्याने जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलेला भारतीय समाज एकसंध होऊ शकतो. या रामकथेचे गारुड सहस्रावधी वर्षे भारतीय मनावर असण्याची कारणे काय, परिणाम काय? साहित्य-संगीत-कला-तत्त्वज्ञान-विज्ञान आदी भारतीय जीवनाच्या असंख्य अंगोपांगांवर त्याची मुद्रा कशी आणि कितपत उमटली आहे, याचा सर्वंकष ऊहापोह करण्यासाठी माटुंगा येथील रुईया महाविद्यालयात दोन दिवसीय रामायण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘महर्षि व्यास विद्या प्रतिष्ठानम्’च्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात डॉ. अशोक मोडक यांच्यापासून ते दाजीशास्त्री पणशीकरांपर्यंत अनेक विद्वानांनी रामकथेचा वेध घेतला.
शनिवारी पहिल्या दिवशी डॉ. परिणीता देशपांडे यांनी भारताबाहेरील रामायणाचा वेध घेतला. चीन, जपान, इंडोनेशिया, कंबोडिया, श्रीलंका, व्हिएतनाम, थायलंड, मलेशिया, लाओस, म्यानमार, तिबेट आदी देशांमध्ये विविध स्वरूपांत अस्तित्वात असलेल्या रामकथेची त्यांनी साधार मांडणी केली. त्यानंतर संतसाहित्यातील रामायण, शिल्पकलेतून रामायण, ऐतिहासिक दृष्टीतून रामायण असे विषय डॉ. अंजली पर्वते, उदयन इंदुरकर आणि डॉ. सूरज पंडित यांनी मांडले. हिंदूंचे कम्बोडियात असलेले जगातील सर्वात मोठे, वेरूळमधील शिल्पकृतींतून दिसणारे रामायण आदी अनेक दाखले देत इंदुरकर यांनी स्थापत्य कलेतील रामकथेची महत्ता वर्णिली. तर समाजोद्धारासाठी संतांनी लोकोत्तर रामचा आत्मारामापर्यंत घडविलेला प्रवास डॉ. पर्वते यांनी उलगडून सांगितला. रामकथेचा ऐतिहासिक अंगाने आढावा घेण्याचा डॉ. पंडित यांचा प्रयत्न मात्र रटाळ निवेदन आणि विस्कळीत मांडणी यामुळे तितकासा यशस्वी झाल्याचे दिसले नाही.
दुसऱ्या दिवशी डॉ. अशोक मोडक, डॉ. सिसिलिया कार्व्हालो, प्रा. प्रकाश खांडगे, डॉ. माधवी नरसाळे आणि दाजीशास्त्री पणशीकर या दिग्गजांनी रामायणाचा वेध घेतला. यांपैकी कार्व्हालो आणि खांडगे यांनी लोकसाहित्य आणि लोककलेतून प्रकटणाऱ्या रामायणावर भाष्य केले. दशावतारापासून ते जात्यावरल्या ओव्यांपर्यंत कुठे कुठे आणि कशी कशी रामकथा डोकावते, हे त्यांनी खुसखुशीत संदर्भ देत मांडले.
या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमात धनश्री लेले यांनी सादर केलेला ‘रंग रामायणाचा - कुंचला भास भवभूतीचा’ आणि सोनिया परचुरे यांचा ‘नृत्यसंगीतात्मक रामायण’ हे कार्यक्रम विशेष लक्षणीय आणि दिवसभरातील व्याख्यानांच्या एकसुरीपणात रंग भरणारे ठरले. रुईया महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेले संस्कृतातील गीतरामायणही उपस्थितांची दाद मिळविणारे होते.
रुईया संस्कृत विभागाच्या प्रमुख डॉ. मंजूषा गोखले यांनी प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे, मनोरंजन करणे आणि संस्कार जपणे यापलीकडे जाऊन अभ्यासपूर्ण दृष्टीने रामायणाकडे पाहण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न होता. आणि त्याला चोखंदळ श्रोत्यांकडून मिळालेली दाद पाहता हा प्रयत्न बहुतांशी यशस्वी ठरला, असे म्हणता येईल.

डॉ. मोडक यांनी प्रभू रामचंद्रांनी केलेली युद्धे ही साम्राज्य विस्तारासाठी नव्हे तर मांगल्य पेरण्यासाठीच होती, असे मत मांडले. त्यासाठी रावण-वाली वधानंतर त्यांच्याच बंधूंची राज्यासनावर केलेली पुनर्स्थापना आदी रामकृत्यांचा आधार त्यांनी घेतला. समारोपाच्या भाषणात दाजीशास्त्रीनी रामकथेची महत्ता वर्णन करताना रामकथेबाबत उपस्थित केल्या जाणाऱ्या काही शंकांचे निरसन केले. सीतात्याग, लक्ष्मणाला देहदंड आदी आक्षेपांतून रामाच्या विभूतीमत्त्वाला मोकळे करणारी भूमिका त्यांनी मांडली.

डॉ. नरसाळे यांचा विषय अगदीच वैशिष्ट्यपूर्ण होता. चित्रपट, मालिका, अ‍ॅनिमेशनपट, संगणक -भ्रमणध्वनीवरील खेळ या सर्व अत्याधुनिक माध्यमांतून दिसणाऱ्या रामकथेचा त्यांनी मागोवा घेतला. मुलांना रामकथा कळावी, लक्षात राहावी यासाठी अमेरिकास्थित भारतीय अभियंत्याने तयार केलेल्या एका अ‍ॅपचीही माहिती त्यांनी या वेळी दिली.

Web Title: Ruia 'Ram Rangi Rangale'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.