Rubber mats in the garden at Kandivali | कांदिवली येथील उद्यानातील रबर मॅट दुरवस्थेत

कांदिवली येथील उद्यानातील रबर मॅट दुरवस्थेत

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरातील उद्यानांसह मैदानांची देखभाल दुरुस्ती व्यवस्थित केली जात असल्याचा दावा मुंबई महापालिकेकडून केला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. त्याचे उदाहरण म्हणजे कांदिवली येथील ‘मनपा राजे शिवाजी मैदान’ हे होय. येथील रबर मॅट दुरवस्थेत असून, याची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

येथील फाइट फॉर राइट फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार, कांदिवली पश्चिम येथील चारकोप सेक्टर १ मधील मनपा राजे शिवाजी मैदानात लहान मुलांना खेळण्यासाठी टाकण्यात आलेल्या रबरी मॅटची दुरवस्था झाली आहे. रबरी मॅट त्वरित दुरुस्ती करण्यात यावे, यासाठी मनपा आयुक्त, उपआयुक्त परिमंडळ ७ व सहायक आयुक्त आर-दक्षिण विभाग यांना लेखी निवेदन दिले आहे. रबरी मॅटची दुरुस्ती त्वरित झाली नाही, तर आर-दक्षिण विभाग कार्यालयासमोर रहिवाशांसोबत ठिय्या आंदोलन करण्यात येईल.
मुंबई महापालिकेने शहर आणि उपनगरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी सुरू केलेला सोशल नेटवर्क साइट्सचा वापर आता जमेची बाजू ठरत आहे. पालिकेच्या सर्व २४ विभागांसह ७ खात्यांच्या ‘टिष्ट्वटर हँडल’वर मुंबईकरांकडून फोटोसह अपलोड करण्यात आलेल्या तक्रारींवर पालिका त्वरित कार्यवाही करत असून, नागरी समस्या लवकरात लवकर सोडविण्यावर भर दिला जात आहे. मात्र, उद्यानांसह मैदानाबाबतही कार्यवाही अपेक्षित असल्याचे मुंबईकरांचे म्हणणे आहे.

देखभाल महत्त्वाची
मुंबईत एक हजार ६८ भूखंडांवर उद्याने, मैदाने व मनोरंजन मैदाने आहेत. या सुविधांचा वापर नागरिकांद्वारे नियमितपणे केला जातो. या उद्यानांची व मैदानांची देखभाल ही स्वयंसेवी संस्था, सोसायटी, व्यक्ती यांच्या सहकार्यासह अधिक चांगल्या प्रकारे व्हावी, यासाठी महापालिकेने प्रयत्नशील राहिले पाहिजे.

टिष्ट्वटर हँडल
मुख्य टिष्ट्वटर हँडल व्यतिरिक्त महापालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांचे स्वतंत्र २४ टिष्ट्वटर हँडल कार्यान्वित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, घनकचरा व्यवस्थापन, पर्जन्य जलवाहिन्या, पूल, रस्ते, उद्यान, जल अभियंता व आरोग्य या महत्त्वाच्या ७ खात्यांचेही टिष्ट्वटर हँडल सुरू करण्यात आली आहेत.

७५० उद्याने
मुंबई महापालिकेची साधारणपणे ७५० उद्याने आहेत. या उद्यानांचा सकारात्मक परिणाम जसा पर्यावरणाच्या दृष्टीने आहे, तसाच तो आरोग्याच्या दृष्टीनेदेखील आहे. याबाबत नागरिकांनी केलेल्या विनंतीचा सकारात्मक विचार करत, महापालिकेची २३ उद्याने ही २४ तास खुली ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Rubber mats in the garden at Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.