Join us

बेकायदा बाइक टॅक्सीवर आरटीओचा बडगा; महामुंबईतील मोहिमेत जप्त केल्या ७८ बाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 09:47 IST

काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत: नरिमन पॉइंटजवळ रॅपिडोची अनधिकृत बाइक टॅक्सी पकडली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : महामुंबईमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत बाइक टॅक्सीवर राज्य परिवहन विभागाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. आरटीओच्या मुंबईतील २० विशेष पथकांनी एकाच वेळी मुंबई, ठाणे, वसई, वाशी, पनवेल येथे संयुक्त कारवाई मोहीम राबवली. यावेळी एकूण १२३ बेकायदा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली, त्यात ७८ बाइक टॅक्सी जप्त करण्यात आल्या. 

कुलाबा, फोर्ट परिसर (चर्चगेट आणि सीएसएमटी) वगळता संपूर्ण मुंबईत रॅपिडो ही सेवा सुरू असल्याची बातमी ‘लोकमत’ने ९ जुलैला प्रसिद्ध केली होती. काही दिवसांपूर्वी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वत: नरिमन पॉइंटजवळ रॅपिडोची अनधिकृत बाइक टॅक्सी पकडली होती. त्यानंतर ही सेवा तत्काळ बंद करण्याचे निर्देश त्यांनी परिवहन विभागाला दिले होते. 

अवैध ॲप ऑपरेटरवरही कायदेशीर प्रक्रिया केवळ मंत्री सरनाईक यांनी पकडलेल्या भागात ही सेवा ॲपवरून बंद ठेवण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानुसार आता आरटीओने महामुंबईमध्ये कारवाईचा सपाटा लावला आहे. 

मोटार वाहन अधिनियम १९८८च्या कलम ९३ नुसार, कोणत्याही प्रवासी वाहतूक सेवेसाठी परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, काही ॲप कंपन्या व चालक हे नियम धाब्यावर बसवत बेकायदा वाहतूक करत असल्याचे उघड झाले आहे. मुंबईमध्ये ओला आणि उबर कंपन्यांनी त्यांची बाइक टॅक्सी सेवा बंद केली आहे.  मात्र, रॅपिडोने त्यांची सेवा सुरूच ठेवली आहे. ॲपच्या माध्यमातून सुरू असलेली ही सेवा बेकायदा असून, शासनाच्या कोणत्याही परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक केली जात असल्याने कारवाई केली आहे.

आरटीओने पकडलेल्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून, अवैध ॲप ऑपरेटरवरही कायदेशीर प्रक्रिया सुरू केल्याचे अधिकारी म्हणाले.

टॅग्स :आरटीओ ऑफीस