Join us

आरटीईची सोडत आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने; राज्यातील सोडत १७ मार्चला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 02:47 IST

१७ मार्च रोजी सोडत लागल्याचे किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव असल्याचे मेसेजेस पालकांना १९ मार्च रोजी दुपारनंतर प्राप्त होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई : बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (आरटीई) कायद्यांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीची सोडत १७ मार्च रोजी होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे (कोविड- १९) ही सोडत यंदा कोणत्याही हॉलमध्ये आयोजित न करता, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने आयोजित करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सर्व प्राथमिक शिक्षणाधिकारी, मनपा शिक्षण निरीक्षक, विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगकरिता उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यंदा संभाव्य वेळापत्रकाप्रमाणे आरटीईची ही सोडत १२ ते १३ मार्चला अपेक्षित होती. तांत्रिक कारणास्तव ही प्रक्रिया पुढे ढकलली गेली असल्याचे कळविण्यात आले होते.

१७ मार्च रोजी सोडत लागल्याचे किंवा प्रतीक्षा यादीमध्ये नाव असल्याचे मेसेजेस पालकांना १९ मार्च रोजी दुपारनंतर प्राप्त होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. कोरोनामुळे पालक, विद्यार्थ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे. गर्दी टाळणे हादेखील यावर एक उपाय आहे. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचा निर्णय घेण्यात आला. सोडतीनंतर पालकांनी फक्त मेसेजेसवर अवलंबून न राहता, अर्ज क्रमांक टाकून आपले नाव यादीत आहे की नाही हे तपासून पाहावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.गर्दी न करण्याचे आवाहनराज्यभरातील ९ हजार ३३१ शाळांमधील १ लाख १५ हजार २९८ जागांकरिता तब्बल २ लाख ९५ हजार २३६ अर्ज आले आहेत, तर मुंबईतून १४ हजार १३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यामुळे अनेक पालकांचे लक्ष या सोडतीकडे आहे. यंदा दुपटीने अर्ज आल्याने मोठी चुरस पहिल्याच सोडतीत अपेक्षित आहे. दरम्यान, राज्यातील व शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता, सोडत जाहीर झाल्यानंतर पालकांनी प्रवेशासाठी पडताळणी समितीकडे गर्दी करू नये, असेही प्राथमिक संचालनालयाकडून सांगण्यात आले आहे.

टॅग्स :शिक्षण हक्क कायदा