Join us

Mohan Bhagwat: “मंदिरांचा इतिहास जाणीवपूर्वक लपवला गेला”; मोहन भागवत यांचे परखड मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2022 8:01 AM

Mohan Bhagwat: प्राचीन मंदिरे ही पराक्रम, शास्त्र व ज्ञानाची साक्ष देणारी होती, असे मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

मुंबई: अध्यात्मसाधनेसाठी तर मंदिरे आहेतच, परंतु मंदिरे म्हणजे समाजजीवनाची केंद्रे होती. सर्व संस्कृतींमध्ये केवळ भारतीय संस्कृतीच भौतिकतेच्या पलिकडे जाऊ शकली. मंदिरांमध्ये पाठशाळा चालतात, मंदिरांबरोबर अर्थव्यवस्था, कृषिक्षेत्र, व्यापार, इ.चे संबंध जोडलेले असतात. मंदिरे ही समाजाच्या धारणेची साधने होती. मंदिरांकडे पाहून आपल्या पराक्रमाचा गौरव कळतो. त्यामुळेच मंदिरांचा इतिहास आपल्यापासून जाणीवपूर्वक लपवला गेला, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी केले. 

दीपा मंडलिक लिखित 'पराक्रमी हिंदू राजांची मंदिरे' या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. दादर येथील सावरकर स्मारकामध्ये हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना भागवत म्हणाले की, पराक्रमी राजे भव्य मंदिरे निर्माण करीत असत. परंतु असे असूनही, त्यांनी मंदिरांवर स्वतःचा अधिकार ठेवला नाही, तर ही मंदिरे समाजाला अर्पण केली. तिरुवनंतपुरम, कालहस्ती, सोमनाथ, इ. ठिकाणच्या मंदिरांच्या वैशिष्ट्यांचा उल्लेख करत दीपा मंडलिक लिखित या पुस्तकातून मंदिरांकडे पाहण्याची आपली दृष्टी कशी असावी हे कळते, अशी प्रतिक्रियाही भागवत यांनी यावेळी व्यक्त केली. 

सर्वांनी एकजूट दाखविल्याने हे मंदीर उभे राहिले

एका मंदिरासाठी प्रदीर्घकाळ आंदोलन का करावे लागले, अशी विचारणा करत, पक्ष आणि सर्व भेद विसरून सर्वांनी एकजूट दाखविल्याने हे मंदीर उभे राहिले. मंदिरांचा व पराक्रमांचा इतिहास आधीही दडविला गेला आणि स्वातंत्र्योत्तर काळातही तीच परंपरा सुरू राहिली. शालेय व महाविद्यालयीन पुस्तकांमधूनही तो फारसा उलगडला नाही. पण, संशोधक, लेखक आणि इतिहासकारांनी तो लोकांपर्यंत पोचविला. प्राचीन मंदिरे ही पराक्रम, शास्त्र व ज्ञानाची साक्ष देणारी होती. केरळमधील पद्मनाभस्वामी मंदिरापासून देशभरातील अनेक मंदिरे ही स्थापत्यशास्त्र आणि अन्य क्षेत्रांतील भारतीयांचे ज्ञान किती प्रगत होते, याचा प्रत्यय देतात, असे भागवत यांनी नमूद केले. 

मंदिरांमधून राष्ट्रदेवतेचेही दर्शन घडते

मंदिरांमधून राष्ट्रदेवतेचेही दर्शन घडते. मंदिरांमध्ये श्रद्धेने गेल्यावर ब्रह्मभावनेचा अनुभव येतो. मंदिरे आध्यात्मिक अनुभूती देणारी आणि मोक्षाप्रत नेणारीही होती. मंदिरांशी समाजजीवनही निगडीत होते. भारतीय संस्कृती ही जगातील श्रेष्ठ संस्कृती आहे. मूर्ती आणि मंदिरे हे भारतीय संस्कृतीचे व्यवच्छेदक लक्षण आहे. इजिप्त, इटली, इराणसह अन्य देशांमध्येही मंदिरे होती, आता ती कुठे आहेत, असे ज्येष्ठ पुरातत्व वेत्ते आणि मूर्तीशास्त्र व मंदिरांचे अभ्यासक डॉ. गो. ब. देगलूरकर यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :राष्ट्रीय स्वयंसेवक संघमोहन भागवतमंदिर