Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएस मुंबईत पहिल्यांदाच देणार इफ्तार पार्टी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 11:53 IST

इस्लामिक देशांचे मुत्सद्दी उपस्थित राहणार

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित मुस्लिम राष्ट्रीय मंच रमजानच्या निमित्तानं मुंबईत प्रथमच इफ्तार पार्टी देणार आहे. 4 जूनला सह्याद्री अतिथीगृहात आयोजित करण्यात येणाऱ्या या पार्टीला मुस्लिम देशांचे मुत्सद्दी उपस्थित राहतील. याशिवाय मुस्लिम समुदायातील प्रतिष्ठित मंडळींनांदेखील या पार्टीचं निमंत्रण देण्यात आलंय. याआधी मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून कधीही इफ्तार पार्टी देण्यात आली नव्हती.  मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे राष्ट्रीय संयोजक विराग पचपोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 देशांचे मुत्सद्दी या पार्टीला उपस्थित राहणार आहेत. याशिवाय मुस्लिम समाजातील 200 प्रतिष्ठित व्यक्तींना या पार्टीचं आमंत्रण देण्यात आलंय. इतर समुदायातील 100 पाहुणे या पार्टीत सहभागी होतील, असा अंदाज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संदेश मुस्लिम समाजापर्यंत पोहोचावा, यासाठी 2015 पासून इफ्तार पार्टीचं आयोजन करण्यात येतं. पंतप्रधानांचं निवासस्थान असलेल्या बंगल्यात इफ्तार पार्टी आयोजित करणार नाही, असा निर्णय मोदींनी 2015 मध्ये घेतला. त्यानंतर संघानं मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या माध्यमातून इफ्तार पार्टीचं आयोजन सुरू केलं. आतापर्यंत संघानं फक्त उत्तर भारतातच इफ्तार पार्टीचं आयोजन केलंय. मुंबईत इफ्तार पार्टीचं आयोजन करुन देशाच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील मुस्लिमांपर्यंत पोहोचण्याचा संघाचा प्रयत्न आहे. याविषयी अधिक बोलताना पचपोरे म्हणाले की, 'मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यानं अनेक देशांचे वाणिज्य दूतावास मुंबईत आहेत. याशिवाय मुस्लिम उद्योगपती, व्यापाऱ्यांचं प्रमाणदेखील मुंबईत जास्त आहे. देशाच्या विकासात त्यांचं मोठं योगदान आहे. यासोबतच चित्रपट क्षेत्रात स्वत:चा ठसा उमटवणारे मुस्लिम कलाकाराही मुंबईत मोठ्या संख्येनं राहतात. इफ्तार पार्टीच्या माध्यामातून या सर्वांशी संवाद साधण्याचा आमचा प्रयत्न असेल.' 

टॅग्स :राष्ट्रीय स्वयंसेवक संघमुस्लीम