Join us

भूखंड अदलाबदलीत पाचशे कोटींचा घोटाळा; भाजप आमदार योगेश सागर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2022 07:38 IST

खासगी विकासकाचे या भूखंडावर कोणतेही विकासकाम होणार नव्हते. पालिकेने या भूखंडाच्या मोबदल्यात त्याला पर्यायी भूखंड दिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  माहुल पंपिंग स्टेशनसाठी पालिकेने खासगी विकासकाबरोबर भूखंड अदलाबदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यवहारात पाचशे कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचा आरोप करीत या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी भाजपचे आमदार योगेश सागर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मात्र, या आरोपांचे खंडन करीत सुपारी घेतल्यासारखे हे आरोप आहेत. ते आरोप सिद्ध करून दाखवा, असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.

ब्रिमस्ट्रोवॅड प्रकल्पाअंतर्गत प्रस्तावित आठपैकी मोगरा आणि माहुल प्रकल्पाचे काम रखडले आहे. अखेर खासगी विकासकाकडून भूखंड ताब्यात घेऊन माहुल पंपिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. या मोबदल्यात पालिकेने विकासकाला जवळचा भूखंड दिला आहे. मात्र, या अदलाबदलीवर संशय व्यक्त करीत योगेश सागर यांनी या प्रकरणात चौकशी करण्याची करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

खासगी विकासकाचे या भूखंडावर कोणतेही विकासकाम होणार नव्हते. पालिकेने या भूखंडाच्या मोबदल्यात त्याला पर्यायी भूखंड दिला आहे. मात्र, विकासकामांसाठी ताब्यात घेतलेले भूखंड पालिका दुसऱ्यांना देऊ शकत नाही, तर हा भूखंड पालिका कसा देणार? असा सवाल त्यांनी केला आहे. 

‘आरोप सिद्ध करावेत’ याबाबत स्पष्टीकरण देताना यापूर्वीही या प्रकल्पावर आरोप झाले आहे. या अदलाबदलीमध्ये एक रुपयाचेही नुकसान पालिकेला होणार नाही. आरोप सिद्ध करून दाखविण्याची हिंमत ठेवावी, असा टोला महापौरांनी सागर यांना लगावला आहे.