लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वेव्हजने एका वेगळ्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. वेव्हजचे ग्लोबल कॅपिटल मुंबईच असेल. याचे आयोजन मुंबईत करू. यासाठी महाराष्ट्र सरकार १५० कोटी वेगळे ठेवेल. केंद्र सरकारही मदत करीलच. पुढील वेव्हज दहापट जास्त भव्य-दिव्य करू, असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमा (एनएफडीसी) येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नाॅलॅाजीज (आयआयसीटी) आणि गुलशन महलमध्ये ‘भारत पॅव्हेलियन’चे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, आयएनबीचे सचिव शेखर कपूर, सीबीएफसीचे अध्यक्ष प्रसून जोशी, महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश कुमार, विकास खारगे, साकेत मिश्रा, आदी उपस्थित होते. वेव्हजच्या आउटकम रिपोर्टच्या अनावरणानंतर माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात प्रकल्प उभारणीसाठी प्रसारभारती, उद्योग विभाग आणि महाराष्ट्र, चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळामध्ये झालेल्या सामंजस्य कराराची देवाणघेवाण झाली. आयआयसीटीच्या लोगोचे अनावरणही करण्यात आले. आयआयसीटी कॅम्पसमधून पहिल्या वर्षात ३०० विद्यार्थी बाहेर पडतील. दुसरा कॅम्पस गोरेगावमधील फिल्म सिटीत दोन वर्षांत पूर्ण होणार आहे.
फडणवीस म्हणाले, वेव्हज इव्हेन्ट नसून, ती मुव्हमेंट आहे. पण आता हे एक आंदोलन बनले आहे. त्याच आंदोलनाचा एक भाग असलेल्या आयआयसीटीची घोषणा त्यावेळी केली होती. विक्रमी वेळेत याचे उद्घाटन केले. पुढील दोन वर्षांत हे कॅम्पस खूप मोठी भूमिका बजावण्यासाठी सज्ज होईल. येथे केवळ शिकण्यासाठी लोक येणार नाहीत, तर ते पाहण्यासाठीही येतील.
आयआयसीटीमुळे देशातील तरुणांना वाव मिळणार आहे. यासाठी ४०० कोटी रुपयांचे बजेट आहे. फिल्म सिटीमध्ये देशातील सुंदर कॅम्पस बनवले जाणार आहे. तिथले नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवून कॅम्पस तयार करण्यात येणार आहे. आगामी तीन-चार महिन्यांत डिझाइन पूर्ण होऊन काम सुरू होईल. आययसीटीमध्ये जगातील आघाडीच्या ब्रँडसोबत पार्टनशिप झाली आहे. चार युनिव्हर्सिटीसोबत टायअप केले जाईल. वेगवेगळ्या कोर्सेससाठी ॲडमिशन्स सुरू झाल्याचेही केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.