Join us
Daily Top 2Weekly Top 5

ताडदेवमधील घरातून साडेदहा लाखांची चोरी;केअर टेकरविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 09:14 IST

केअर टेकरनेच हे दागिने चोरल्याचा संशय असून ताडदेव पोलिस तपास करत आहेत.

मुंबई : ताडदेव परिसरात एका घरातून तब्बल साडेदहा लाखांचे दागिने चोरीला गेल्याने खळबळ उडाली आहे. केअर टेकरनेच हे दागिने चोरल्याचा संशय असून ताडदेव पोलिस तपास करत आहेत.

तक्रारदार देविका पांचाळ (४०) या आपल्या कुटुंबासह जयवंत इंडस्ट्रीज जवळ एका बंगल्यात राहत आहेत. त्यांच्या ७० वर्षीय वडिलांना पॅरालिसीसचा त्रास असल्याने त्यांच्या देखरेखीसाठी त्यांनी केअर टेकर म्हणून एका तरुणाची नेमणूक केली होती. येणारा केअर टेकर हा वडिलांची सेवा करून ११ वाजता घरी जात असे. ९ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५:३० वाजता देविका पांचाळ आपल्या वडिलांच्या खोलीत गेल्यावर त्यांनी लाकडी कपाट उघडे असल्याचे आणि कपडे अस्ताव्यस्त पडलेले पाहिले.

'त्याच्या' विरोधात संशय का निर्माण झाला?

ड्रॉवर उघडा असून चावी बाहेर ठेवलेली होती, जी कपाटाच्या आत सुरक्षित ठेवलेली असायची. तपासणीअंती सोन्याचा हार, सोनसाखळी, अंगठी, कानातले, बांगड्या असा साडेदहा लाखांचा ऐवज गायब असल्याचे दिसून आले.

या दिवशी केअर टेकर आणि भांडी धुणाऱ्या कामगाराचा भाऊ आलेला होता; मात्र वडिलांच्या खोलीत केवळ केअर टेकर गेल्याची माहिती असल्याने त्याच्यावर संशय व्यक्त करून देविका पांचाळ यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

गुन्हा नोंदविला, तपास सुरू

पोलिसांनी गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. घरातील सीसीटीव्ही फुटेज, तसेच केअर टेकरच्या पार्श्वभूमीची चौकशी केली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :मुंबईमुंबई पोलीस