Join us
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते कामांसाठी एक हजार कोटींच्या निविदा; म्हाडा वसाहतीतील रस्त्यांसाठी तीनशे कोटी खर्च करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 20:40 IST

दरवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून रस्त्यांची काम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात येतात.

मुंबई - रस्ते दुरुस्तीसाठी ११०० कोटी रुपयांचे कंत्राट देण्यासाठी पालिकेने मागविलेल्या निविदा ठेकेदारांच्या कमी बोलीमुळे अडचणीत आल्या. या निविदा रद्द केल्यानंतर प्रशासनाने आता शहर व उपनगरातील सिमेंट व डांबरी रस्त्यांसाठी एक हजार कोटी रुपये खर्चाच्या निविदा मागविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यामध्ये तीनशे कोटी रुपये म्हाडा वसाहतींतील रस्त्यांच्या कामासाठी वारपण्यात येणार आहे. 

दरवर्षी पावसाळ्यानंतर ऑक्टोबरपासून रस्त्यांची काम मोठ्या प्रमाणात सुरु करण्यात येतात. मात्र यावर्षी रस्त्यांचे कंत्राट निविदा प्रक्रियेत अडकून पडले आहे. ११०० कोटींच्या रस्त्यांच्या कामांसाठी मागविलेल्या निविदेत ठेकेदारांनी कमी बोली लावली होती. या कामांसाठी पालिकेने अंदाजित केलेल्या रक्कमेपेक्षा ३० टक्के कमी खर्चाची बोली ठेकेदारांनी लावली होती. यामुळे कामाच्या दर्जेबाबतच साशंकता व्यक्त करीत भाजपने या निविदेला विरोध केला होता. अखेर पालिका प्रशासनाने ही निविदा प्रक्रियाच रद्द केली. त्यांनतर पालिकेने फेरनिविदा मागविण्याची जाहीर केले होते. 

पहिल्या टप्प्यात एक हजार १०० कोटींच्या रस्ते कामाच्या निविदा मागविल्यानंतर पालिका प्रशासनाने दुसऱ्या टप्प्यात एक हजार कोटींच्या निविदा मागविल्या आहेत. यामध्ये शहर भागातील परळ, वरळी, लोअर परळ, दादर, मुंबई सेंट्रल येथील दुरुस्तीचा समावेश आहे. तर उपनगरात दहिसर, बोरिवली, अंधेरी, कुर्ला या विभागांचा समावेश आहे. पालिकेने इच्छूक कंपन्यांकडून ३ नोव्हेंबर पर्यंत निविदा मागवल्या आहेत. मात्र या दिरंगाईमुळे मुंबईतील रस्त्यांची कामं लांबणीवर पडली असल्याची तीव्र नाराजी नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. 

म्हाडा वसाहतीतील रस्त्यांची कामं पालिकेकडे-

राज्य सरकारने २०१८ मध्ये म्हाडामधील नियोजन प्राधिकरणाची जबाबदारी म्हाडाला दिली होती. त्यामुळे प्राथमिक सुविधा पुरविण्याबाबत पेच निर्माण झाला होता. मात्र काही महिन्यांपूर्वी राज्य सरकारने पुन्हा प्राथमिक सुविधा देण्याची जबाबदारी पालिकेवर सोपवली आहे. त्यानुसार म्हाडा वसाहतीतील रस्त्यांची काम करण्यासाठी तीनशे कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. 

टॅग्स :मुंबई महानगरपालिकाम्हाडा