रिपाइंला आस भाजपाच्या मैत्रीची
By Admin | Updated: March 15, 2015 00:14 IST2015-03-15T00:14:12+5:302015-03-15T00:14:12+5:30
महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत.

रिपाइंला आस भाजपाच्या मैत्रीची
नवी मुंबई : महापालिका निवडणुकीची प्रत्यक्ष आचारसंहिता पुढील आठवड्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अनेकांनी उमेदवार निवडीसाठी मुलाखतीही सुरू केल्या आहेत. रिपाइंत मात्र अद्याप संभ्रमाचे वातावरण आहे. स्वबळावर लढायचे की, एखाद्या सक्षम पक्षाचा आधार घ्यायचा याबाबत पक्षात मतभिन्नता आहे. असे असले तरी या निवडणुकीत रिपाइंला भाजपाच्याच मैत्रीची आस लागल्याचे दिसून आले आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर शहरातील राजकीय समीकरण पूर्णत: बदलले आहे. या बदललेल्या परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी लहान-मोठे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. रिपाइं हा महायुतीचा घटक आहे. त्यामुळे या निवडणुकीत भाजपासोबत राहायचे की, शिवसेनेबरोबर जायचे, याबाबत पक्षात अद्यापि संभ्रम आहे. भाजपा-शिवसेना युती झाल्यास १८ जागा सोडाव्यात. मात्र युती न झाल्यास भाजपा किंवा शिवसेना यापैकी जो पक्ष किमान २८ जागा सोडेल त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय रिपाइंने घेतला आहे. मात्र सध्या शिवसेना व भाजपा यांची युती होण्याची शक्यता धूसर झाली आहे. रिपाइं हा महायुतीचा घटक पक्ष असला तरी सध्या तो भाजपासोबत आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत भाजपाबरोबर युती व्हावी, असे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाचे मत आहे. भाजपाकडून वाटाघाटीला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. लवकरच जागावाटपासंदर्भात भाजपासोबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अंतिम बोलणी करण्यात येणार असल्याचे रिपाइंचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहोळ यांनी सांगितले. भाजपासोबतच्या चर्चेतून जागावाटपासंदर्भात सकारात्मक तोडगा न निघाल्यास जो पक्ष सन्मानाने बोलवेल त्याच्याबरोबर जाण्याचा विचार केला जाईल. अन्यथा अंतिम पर्याय म्हणून समविचारी पक्ष व संघटनांना एकत्रित करून स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील, असेही ओहोळ यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
च्भाजपासोबत वाटाघाटी सुरू आहेत. मात्र म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने रिपाइंच्या कार्यकर्त्यांत नाराजीचा सूर आहे.
च्येत्या दोन - तीन दिवसांत जागावाटपासंदर्भात भाजपासोबत पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून अंतिम बोलणी करण्यात येणार असल्याचे सिद्राम ओहोळ यांनी सांगितले.