Join us  

गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीच्या शिरपेचात रोवला मानाचा तुरा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 5:54 PM

Gorai Fishermen's : पॉलिक्लिनिक व डे केअर सेंटर उभारले 

मनोहर कुंभेजकर

मुंबई: देशाची आर्थिक राजधानी असलेल्या बोरिवली पश्चिम खाडी पलीकडील गोराई, मनोरी व कुलवेम या गावात आजही महापालिकेची आरोग्य सुविधा नाही.एखादी घटना घडल्यास येथील नागरिकांना भाईदर बोरिवलीला जावे लागते. रुग्णांला वेळीच उपचार मिळाले नसल्याने रुग्ण दगावण्याच्या घटना देखिल घडल्या आहेत. त्यामुळे येथील गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीच्या तरुण संचालक मंडळांनी पुढाकार घेऊन येथें रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसर यांच्या सहकार्याने पॉलिक्लिनिक व डे केअर सेंटर उभारले आहे. गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचा आम्ही प्रयत्न केला असून भविष्यात 50 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल येथे उभारण्याचा मानस या सोसायटीचे अध्यक्ष जोजफ कोलासो यांनी लोकमतशी बोलतांना व्यक्त केला. पॉलिक्लिनिक व डे केअर सेंटरची उभारणारी करणारी ही राज्यातील पहिली मच्छिमार संस्था असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.

या संस्थेच्या पॉलिक्लिनिक व डे केअर सेंटरचे लोकार्पण काल रात्री राज्याचे मत्स्यव्यवसाय,बंदर खात्याचे मंत्री व मुंबई शहराचे पालक मंत्री अस्लम शेख यांनी केले.गोराई,मनोरी,भाटी,मढ,मालवणी ही  गावे शेकडो वर्षांपासून आहे, मात्र आजही येथे सुसज्ज आरोग्य सुविधा नाही. या मच्छिमार सोसायटीने पुढाकार घेऊन येथील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्धल त्यांनी या संस्थेचे कौतुक केले. या पॉलिक्लिनिक व डे केअर सेंटरला 10 लाखांची मदत आणि 2 डायलिसिस मशीन्स भेट देण्याची त्यांनी घोषणा केली. शासन गोराईकरांच्या मागे खंबीरपणे उभे असून येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात येत्या 10 दिवसात संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्याचे ठोस आश्वासन त्यांनी दिले.

मनोरी गावात माझे आई वडील राहत होते या आठवणींना उजाळा देतांना आज राज्याचा मंत्री म्हणून मी येथे आलो आहे. गोराईकरांनी माझे बँड वाजवून आणि कोळी गीतांनी जोरदार स्वागत केल्याबद्धल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील,येथील मथाई चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो, डॉ.मिलींद कदम,रोटरी क्लबचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुनील मेहरा, रोटरी क्लब ऑफ मुंबई दहिसरचे अध्यक्ष रणजित बिजूर, सचिव शरद जैन, प्रकल्प अध्यक्ष जीवराज झाला, डॉ.आशितोष पवार,गोराई मच्छिमार सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जोजफ कोलासो, सचिव रॉनी किणी,उपाध्यक्ष जोनस मानाजी, मुंबई काँग्रेसच्या मच्छिमार सेलचे अध्यक्ष धनाजी कोळी आदी मान्यवर आणि गोराईकर नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. 

टॅग्स :आरोग्यमुंबई