रोहयो भ्रष्टाचाराचा अहवाल मागवला
By Admin | Updated: December 7, 2014 23:08 IST2014-12-07T23:08:42+5:302014-12-07T23:08:42+5:30
वन विभाग, पंचायत समितीअंतर्गत रोहयोच्या कामांतील भ्रष्टाचाराचा अहवाल मागितल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी मनोर येथे एका कार्यक्रमात दिली

रोहयो भ्रष्टाचाराचा अहवाल मागवला
हितेन नाईक, पालघर
जव्हार, विक्रमगड आणि डहाणू तालुक्यांतील कृषी, वन विभाग, पंचायत समितीअंतर्गत रोहयोच्या कामांतील भ्रष्टाचाराचा अहवाल मागितल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी मनोर येथे एका कार्यक्रमात दिली. या प्रकरणाची आपण गंभीरपणे दखल घेतली असून आदिवासींच्या विकासाआड येणाऱ्या भ्रष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले.
पालघर जिल्ह्यातील जव्हारच्या चांभारशेत, खरोंडा इ. आदिवासीबहुल भागांत रोहयोअंतर्गत दीड कोटीची कामे प्रत्यक्षात झाली नसताना ती कागदोपत्री झाल्याचे बोगस मस्टरद्वारे दाखवून भ्रष्टाचार केल्याचे वृत्त प्रथम लोकमतने प्रसिद्ध केले. त्यानंतर, विक्रमगड तालुक्यातील कासा बुद्रुक ग्रा.पं.अंतर्गत तर डहाणू तालुक्यातील वाघाडी, वनई इ. भागांतील विहीर खोदणे, चर खोदणे, बुरूज व बांधबंदिस्ती या कामांत मोठा भ्रष्टाचार झाल्याची मालिकाच लोकमतने सुरू केली आहे. त्यामुळे या योजनेंतर्गत पालघर जिल्ह्यातील गावपाड्यांमध्ये या योजनेतील भ्रष्टाचाराने शिरकाव केल्याचे वास्तव समोर येते आहे. या प्रकरणामधील सत्यता प्रथमदर्शनी दिसून आल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी याप्र्रकरणी वरिष्ठ पातळीवर कळविले होते. त्यानंतर, ३ डिसेंबरला या भ्रष्टाचाराचे सोशल आॅडिट होण्यासंदर्भात एक बैठक जव्हार येथे पार पडली. यात मंत्रालयीन पातळीवरील वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपजिल्हाधिकारी सहभागी झाले होते.
या योजनांचा लाभ गरीब आदिवासींना मिळत नाही. त्यामुळे आजही आदिवासींचे स्थलांतर, कुपोषण यासारख्या महत्त्वपूर्ण समस्या जैसे थे आहेत. त्यामुळे या योजनेत भ्रष्टाचार केलेल्यांची गय होणार नसून या प्रकरणाचा अहवाल मी मागितला आहे. या प्रकरणातील दोषींवर कडक कारवाईचे स्पष्ट आदेश दिल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.