रोहेकरांचे आरोग्य धोक्यात
By Admin | Updated: May 16, 2015 22:47 IST2015-05-16T22:47:40+5:302015-05-16T22:47:40+5:30
रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेजवळ असणाऱ्या इंडो एनर्जी जेटीवरून कोळशाची वाहतूक केली जाते. परंतु सध्या या जेटीवर रॉक फॉस्फरस उतरविण्यात आले आहे.

रोहेकरांचे आरोग्य धोक्यात
मिलिंद अष्टीवकर - रोहा
रोहा तालुक्यातील सानेगाव आश्रमशाळेजवळ असणाऱ्या इंडो एनर्जी जेटीवरून कोळशाची वाहतूक केली जाते. परंतु सध्या या जेटीवर रॉक फॉस्फरस उतरविण्यात आले आहे. संबंधित रॉक फॉस्फरस अलिबाग रामराज मार्गे रोहा रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेत साठवून ठेवल्याने परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कोकणच्या सौंदर्याला बाधा पोहोचविणारे उद्योग नसावेत, अशी कोकणवासीयांची नेहमीच मागणी असते. सानेगाव येथील जेटीवरून उडणाऱ्या कोळशाच्या भुकटीमुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत स्थानिकांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळ, तहसीलदार यांच्याकडे वारंवार तक्रार अर्ज केले आहेत.
इंडो एनर्जी जेटीवर मागील दीड महिन्यापासून रॉक फॉस्फरस उतरविण्यात येत आहे. सदरचे फॉस्फरस ज्वालाग्राही आहे. फॉस्फरस वाऱ्यामुळे डोळ्यात जात असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या दुचाकीस्वारांना तसेच गाडीच्या चालकांना त्रासदायक ठरत आहे. सुमारे वर्षभरापूर्वी इंडो एनर्जी जेटी कायमची बंद करण्यात यावी, असा ठराव स्थानिक ग्रामस्थांनी ग्रामसभेत घेतला आहे. स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्याकडे येथील नागरिकांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे.
येत्या चार दिवसांत जेटी व्यवस्थापनाने आरोग्याला अपायकारक असणारे रॉक फॉस्फरस न हटविल्यास शेतकरी कामगार पक्षातर्फे इंडो एनर्जी जेटीवर स्थानिकांचा मोर्चा नेण्यात येईल, असा इशारा जिल्हा चिटणीस मंडळ सदस्य गणेश मढवी यांनी दिला आहे. यावेळी पुरोगामी युवक संघटना चिटणीस हेमंत ठाकूर, कुंडलिका पश्चिम खोरे शेतकरी बचाव संघटनेचे अध्यक्ष संतोष दिवकर, स्थानिक सरपंच सुजाता मोरे आदी उपस्थित होते.
इंडो एनर्जी जेटी व्यवस्थापनाकडून आरोग्याला अपायकारक ठरणारे रॉक फॉस्फरस त्वरित हटविण्यासंदर्भात नोटीस देणार असल्याचे सांगितले. दिलेल्या मुदतीत जेटी व्यवस्थापनाने सदरचे मटेरियल न हटविल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येईल.
- सुभाष भागडे,
प्रांताधिकारी, रोहा
रोहा तालुक्यातील सानेगाव येथील इंडो जेट्टीवर मोठ्या प्रमाणात उतरवण्यात आलेला रॉक फॉस्फरसचा साठा. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.