Join us  

राज्यात 20 एप्रिलपासून 'मेगा भरती', पण रोहित पवारांनी घेतला आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2020 11:06 AM

राज्य सरकारच्या या मेगभऱती प्रकियेला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे

मुंबई - राज्यातील रिक्त पदांसाठी मेगा भरतीची तयारी सुरू असून या मेगाभरतीची तारीख निश्चित झाली आहे. 20 एप्रिलपासून राज्य सरकारमधील रिक्त पदांसाठी मेगभारती होणार आहे. त्यासाठी, 1 लाख 6 हजारांची आरक्षण पडताळणीही पूर्ण झाली आहे. सध्या राज्य सरकारच्या विविध विभागात मिळून साधारण 2 लाख कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. या भरतीला 20 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. मात्र, आमदार रोहित पवार यांनी या भरती प्रक्रियेला आक्षेप घेतला आहे. 

महावकास आघाडी सरकारने महापोर्टल बंद करुन एका खासगी एजन्सीमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, महाआयटी विभागाच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. राज्य सरकारच्या निर्देशानुसार 15 एप्रिलपर्यंत राज्यातील शासकीय मेगा भरतीसाठी एजन्सी नियुक्त केली जाईल. महाआयटी विभागाकडून सक्षम अशी खासगी एजन्सी नियुक्त केली जाणार आहे. त्यासाठीही निविदा दोन दिवसात प्रसिद्ध होईल. सामान्य प्रशासन विभागामार्फत एक परिपत्रक प्रसिद्ध केले जाणार आहे. त्यामध्ये, शासकीय भरती कशी राबवायची याबाबतची माहिती असेल, असे महाआयटीचे मुख्य अधिकारी अजित पाटील यांनी सांगितले आहे. 

राज्य सरकारच्या या मेगभऱती प्रकियेला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. तसेच, महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आवाहनही केलंय. ''राज्यात खासगी एजन्सीद्वारे नोकर भरती करण्याचा घाट घालून तरुणांच्या भवितव्याचा खेळखंडोबा करण्याचा प्रकार मंत्र्यांची दिशाभूल करण्याच्या काही अधिकाऱ्यांच्या खेळामुळे होत आहे. केरळसारख्या राज्याला राज्य लोकसेवा आयोगामार्फत नोकर भरती करता येते तर महाराष्ट्राला ते का शक्य होऊ नये?'', असे रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.   

टॅग्स :रोहित पवारनोकरीसरकारमुंबईएमपीएससी परीक्षा