रोह्यात सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
By Admin | Updated: May 17, 2014 00:27 IST2014-05-17T00:27:59+5:302014-05-17T00:27:59+5:30
रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते यांच्या विजयाचे वृत्त रोह्यात धडकताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.
_ns.jpg)
रोह्यात सेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
रोहा : रायगड लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे अनंत गीते यांच्या विजयाचे वृत्त रोह्यात धडकताच शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. दुसरीकडे राष्टÑवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात मात्र शांतता दिसून आली. रायगड लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार? याची उत्कंठा आज सकाळपासूनच शिगेला पोहचली होती. शहरात ठिकठिकाणी घोळक्याने नागरिक निकालाबाबत चर्चा आणि प्रतीक्षा करीत होते. येणार्या एकएक फेर्यांच्या ताज्या आकडेवारीवरुन अंदाज बांधले जात होते. कधी एकदा निकाल हाती येतोय, अशी अवस्था रोहेकरांची झाली होती. रोह्यातून मतमोजणीच्या ठिकाणी अलिबाग येथे गेलेल्या पक्षांच्या कार्यकर्त्यांकडे ताज्या आकडेवारीसाठी संपर्क केला जात होता. महायुती, आघाडी आणि शेकापमध्ये खरी लढत होती. मतदानानंतर या पक्षांच्या तिघाही उमेदवारांनी आपणच निवडून येणार असे दावे केले होते. कार्यकर्त्यांनीही आपल्या उमेदवाराचा विजय किती मतांनी होईल, याची आकडेमोड करण्यात दिवस-रात्र एक केला होता. अखेर ती वेळ आली आणि दुपारी तीनच्या दरम्यान अनंत गीते हे सुमारे दोन हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्याचे वृत्त रोह्यात धडकले. शिवसेनेचे तालुका प्रमुख अमित उकडे, नगरसेवक दीपक तेंडुलकर, माजी शहर प्रमुख संतोष ऊर्फ बाळा खटावकर, महादेव साळवी, संतोष खेरटकर, अमित वाणी आदींनी ठिकठिकाणी फटाके फोडून आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. (वार्ताहर)