रोहा नगरपालिका नियोजनाची ‘ऐशी की तैशी’
By Admin | Updated: June 19, 2015 21:56 IST2015-06-19T21:56:14+5:302015-06-19T21:56:14+5:30
रोहा शहरासमवेत तालुक्यात गुरुवारपासून मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र करोडो रुपयांच्या विकासकामे करणाऱ्या रोहा नगरपालिकेच्या

रोहा नगरपालिका नियोजनाची ‘ऐशी की तैशी’
रोहा : रोहा शहरासमवेत तालुक्यात गुरुवारपासून मोसमी पावसाने दमदार हजेरी लावली. मात्र करोडो रुपयांच्या विकासकामे करणाऱ्या रोहा नगरपालिकेच्या मर्यादा सलामीच्या पावसाने स्पष्ट केल्या आहेत.
शहरातील मुख्य रस्त्यालगत दुतर्फा गटारनाले नसल्याने पावसाचे पाणी सर्वत्र तुंबले आहे. नगर पालिका प्रशासनाकडे नियोजन नसल्याने त्याचे गंभीर परिणाम रोहेकरांना भोगावे लागत आहेत. नियोजनाची ‘ऐशी की तैशी’ असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही नागरिकांना अनेक समस्यांच्या समोर जावे लागणार आहे.
‘क’ वर्ग असणाऱ्या रोहा नगरपालिकेला राज्य शासनाकडून विविध विकासात्मक कामासाठी करोडो रुपयांचा निधी आणला जातो. परंतु नगरपालिकेने आलेल्या निधीचा विनियोग योग्य प्रकारे न केल्याने नक्की विकास झाला कुणाचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
फिरोज टॉकीजपासून ते दमखाडीपर्यंत असणाऱ्या मुख्य रस्त्यालगत बहुतांश ठिकाणी गटार व नाले नसल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने पाणी रस्त्याच्या सखल भागात तुंबत आहे. त्यामुळे नागरिकांना पायपीट करणे जिकरीचे जात आहे.
मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता, शहरातील मुख्य रस्ता सार्वजनिक बांधकामच्या मालकीचा असल्याने या रस्त्यालगत गटार, नाले बांधणे व साफ करणे त्यांचाच अधिकार आहे, हे सांगून वेळ मारुन नेली. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी सोनावणे यांच्याकडे संपर्क साधला असता, नव्याने इमारतींच्या सांडपाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी पालिकेची असल्याचे सांगितले. (वार्ताहर)