दरड अंगावर कोसळून दोघे ठार

By Admin | Updated: August 5, 2014 23:32 IST2014-08-05T23:07:12+5:302014-08-05T23:32:28+5:30

विन्हेरे येथील प्रकार : मातीचा ढिगारा उपसण्याचे काम सुरू

The rocks collapsed and killed two | दरड अंगावर कोसळून दोघे ठार

दरड अंगावर कोसळून दोघे ठार

खेड : खेड तालुक्यातील विन्हेरे येथे रस्त्याच्या बाजूला असलेली अजस्र दरड कोसळून तुळशी सुतारवाडी येथील दोघेजण ठार झाले आहेत. भागोजी रामजी सुतार (वय ६०) व परशुराम शिवराम सुतार (६०) अशी मृतांची नावे आहेत. तीन जेसीबीच्या साहाय्याने दरड उपसण्याचे काम आज, मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून सुरू करण्यात आले़ ते सायंकाळपर्यंत सुरूच होते़
काल, सोमवारी सायंकाळी ही दरड कोसळली. तुळशी येथील भागोजी सुतार आणि परशुराम सुतार हे आपल्या सुतारकामाचे पैसे मागण्यासाठी विन्हेरे येथील गणेश धोंडू खताते यांच्या घरी गेले होते. तेथून ते रस्त्याने तुळशी येथील सुतारवाडीत आपल्या घराकडे जात असताना सायंकाळी सात वाजता रस्त्याच्या बाजूची दरड कोसळल्याने या दरडीखाली दोघेजण सापडले.
दरड कोसळली त्या ठिकाणापासून एकही गाव अथवा वाडी जवळपास नसल्याने याविषयी सारेच अनभिज्ञ होते. खेड पोलीस रात्री गस्त घालताना ही घटना त्यांच्या लक्षात आली. मात्र, या दरडीखाली कोणी गाडले गेले असावेत, याविषयी पोलिसांनाही सुतराम कल्पना नव्हती.त्यामुळे त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
उपविभागीय पोलीस अधिकारी विलास भोसले, पोलीस निरीक्षक विकास गावडे हे आपल्या पथकासह सकाळी सात वाजता घटनास्थळी पोहोचले. पाठोपाठ तहसीलदार प्रकाश संकपाळ आणि नायब तहसीलदार रवींद्र वाळके यांनी आपल्या पथकासह तीन जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळी धाव घेतली. आज सकाळी आठ वाजल्यापासून ही दरड उपसण्याचे काम सुरू करण्यात आले. यावेळी भागोजी सुतार आणि परशुराम सुतार यांचे मृतदेह आढळले. ही दरड उपसण्याचे काम सार्वजनिक
बांधकाम विभागाचे कामगार आणि जेसीबीच्या साहाय्याने सुरू आहे. तेथील ग्रामस्थही या कामामध्ये सहकार्य करीत आहेत. (प्रतिनिधी)
निर्जन रस्ता...
विन्हेरे हे गाव मुंबई-गोवा महामार्गासाठी पर्यायी असलेल्या मार्गावर आहे. तुळशी येथून हा मार्ग जातो. या रस्त्याने दिवसाही कोणी चालत जात नाही, असा हा मार्ग आहे. सायंकाळच्या सुमारास तर या मार्गावर रहदारीही नसते़ शिवाय मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली किंवा अन्य कारणामुळे रस्ता बंद झाला, तर या मार्गाचा वापर केला जातो. सध्या असे काही झाले नसल्याने या मार्गावर कोणीच नव्हते. त्यामुळे या घटनेची सुतराम कल्पना कोणालाही नव्हती. रात्रीच्या सुमारास दरड उपसण्याचे काम सुरू झाले असते तरी हे दोघेजण वाचले असते, असे काहीजणांनी बोलून दाखविले.

Web Title: The rocks collapsed and killed two

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.