मुंबई : बुडण्याच्या मुंबईतील चौपाट्यांवर घटना रोखण्यासाठी जीवरक्षकांवर अवलंबून राहावे लागते; परंतु आता त्यांच्या जोडीला 'रोबोटिक वॉटर रेस्क्यू' यंत्र येणार आहे. यासाठी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून निविदा काढण्यात आली आहे.
मुंबईतील सहा चौपाट्यांवर प्रत्येकी एक रोबो जीवरक्षकाची भूमिका बजावणार आहे. या आधी निविदेत तुर्की तंत्रज्ञानावर आधारित बोटींचा समावेश असल्याने विरोध झाला होता. त्यामुळे आता भारतीय बनावटीच्या बोटींचा उल्लेख प्रक्रियेत करण्यात आला आहे.
सध्या मुंबई महापालिकेच्या अखत्यारित गिरगाव चौपाटी, दादर शिवाजी पार्क, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई चौपाटी येते. त्या ठिकाणी १११ जीवरक्षक तैनात आहेत. मात्र, अनेकदा समुद्र किनारी येणारे पर्यटक त्यांच्या सूचनांचे पालन करत नाहीत. त्यामुळे ते बुडल्याच्या घटना घडल्या आहेत.
सहा चौपाट्यांवर सहा रोबो
जीवरक्षकांना 'रोबोटिक वॉटर रेस्क्यू'ची मदत देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून, सहा रोबोट सहा चौपाट्यांवर तैनात असतील. यासाठी पालिकेने निविदा काढली होती.
यावेळी भारत-पाकिस्तान संघर्षांदरम्यान पाकला मदत करणाऱ्या तुकींवर अनेक स्तरावर बहिष्कार टाकण्यात येत असल्याने पालिकेकडून तुर्की बनावटीच्या यंत्रखरेदीवर टीका झाली. त्यामुळे ते कंत्राट रद्द करून आता नव्याने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
समुद्रात प्रतितास १८ किमी वेगाने पोहण्याची क्षमता
समुद्रात एखादी व्यक्ती बुडत असेल, तर रिमोटद्वारे हा रोबोट त्या व्यक्तीपर्यंत पाठवला जाईल आणि त्याच्या मदतीने बुडणाऱ्या व्यक्तीला समुद्र किनाऱ्यापर्यंत सुरक्षितरीत्या बाहेर आणले जाईल. त्यामुळेच त्याची वहन क्षमता ही जास्त आहे. समुद्रात प्रतितास १८ किमी वेगाने हा रोबोट पोहोचू शकतो, तसेच साधारण ८०० मीटर आणि त्यापेक्षा जास्त लांब तो जाऊ शकतो. तो एक तास कार्यरत राहू शकतो. त्याला पुन्हा चार्ज करता येते.