मुंबई : राज्य सरकारच्या सर जे. जे. रुग्णालयात बुधवारी रोबोटने पहिली शस्त्रक्रिया केली. रोबोटिक शस्त्रक्रिया करणारे जे. जे. हे पहिले सरकारी रुग्णालय आहे. ज्या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी खासगी रुग्णालयांत तीन ते पाच लाख रुपयांदरम्यान खर्च येतो, ती शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.
डोंबिवलीचे शंकर परब यांच्यावर ही रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना काही महिन्यांपासून हर्नियाचा त्रास होता. शस्त्रक्रियेसाठी त्यांना जे. जे.च्या जनरल सर्जरी विभागात दाखल केले होते. शस्त्रक्रियेनंत परब म्हणाले की, मला फारशा वेदना होत नाहीत. दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. खासगी रुग्णालयात या शस्त्रक्रियेसाठी मोठा खर्च आला असता, पण जेजेमध्ये ती मोफत करण्यात आली.
बुधवारी रोबोटिकच्या साह्यायाने तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. जनरल सर्जरी विभागाचे प्रमुख आणि रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. गिरीश बक्षी, डॉ. अमोल वाघ, डॉ. सुप्रिया भोंडवे आणि डॉ. काशिफ अन्सारी यांनी सहभाग घेतला. सध्या खासगी रुग्णालयांतच रोबोटिक शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यासाठी प्रचंड खर्च येतो. तो गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेर असतो. त्यामुळे राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने अशा शस्त्रक्रियांसाठी जे. जे. रुग्णालयात रोबोट खरेदी केला आहे.
पहिल्या ५०० शस्त्रक्रिया मोफतजेजेतील पहिल्या ५०० रोबोटिक शस्त्रक्रियांचा सर्व खर्च 'रोबो' पुरविणारी कंपनी करणार आहे. त्यामुळे त्यासाठी फार काही खर्च रुग्णांना करावा लागणार नाही. ५०० शस्त्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासकीय योजनांतून खर्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.
रोबोटच्या साहाय्याने बुधवारी तीन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. लॅप्रोस्कोपीक शस्त्रक्रियांसाठी सर्जन्सना कौशल्य पणाला लावावे लागते. त्याचबरोबर अन्न नलिकेचा कॅन्सर, फुप्फुसाजवळच्या शस्त्रक्रिया 'रोबो'ने करण्यात येणार आहेत.डॉ. अजय भंडारवार, विभागप्रमुख, शल्यचिकित्सा विभाग, सर जे. जे. रुग्णालय
जे जे रुग्णालयात आता गरीब रुग्णांवर अत्याधुनिक रोबोटिक शस्त्रक्रिया मोफत केली जाणार आहे. जे जे रुग्णलायलात आता अवघड शस्त्रक्रिया सहजपणे करणे सोपे होणार आहे.हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री