पावसाच्या तोंडावर रस्ते निकृष्ट
By Admin | Updated: May 27, 2014 01:25 IST2014-05-27T01:25:52+5:302014-05-27T01:25:52+5:30
परिसरातील जंगलपट्टी भागातील गावामध्ये नव्याने बनविण्यात आलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असून पहिल्या पावसातच कोट्यवधी रुपये वाहून जाणार असे चित्र सध्या रस्त्यांचे दिसत आहे

पावसाच्या तोंडावर रस्ते निकृष्ट
आरिफ पटेल, मनोर - परिसरातील जंगलपट्टी भागातील गावामध्ये नव्याने बनविण्यात आलेले रस्ते निकृष्ट दर्जाचे असून पहिल्या पावसातच कोट्यवधी रुपये वाहून जाणार असे चित्र सध्या रस्त्यांचे दिसत आहे. मात्र सा. बां. विभाग मूग गिळून बसल्याचे दिसत आहे. नेमलेले शासकीय इंजिनिअर बघ्याची भूमिका घेत आहे. वर्षभर गाढ झोपेत असलेले सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती व जि. प. पावसाच्या तोंडावर खडबडून जागे झाले असून यंदा पालघर तालुक्यातील पूर्व जंगलपट्टी आदिवासी गाव पाड्यावरच्या रस्त्याची कामे ठेकेदारांकडून मोठ्या जोमाने सुरू केली आहेत. दुर्वेस सावरे रस्त्यावर खडीकरण करून रस्ता अर्धवट व निकृष्ट दर्जाच्या तसेच सुकटन, बहाडोळी, मासवन, निहे, घरत पाडा, टेन अशा अनेक गावात रस्त्यांचे काम डांबरचा अरुंद रस्ता तसेच रस्त्याचे लेबलमध्ये खड्डे ही दिसत आहेत.त्यामुळे पहिल्या पावसातच सर्व रस्ते वाहून जाण्याची दाट शक्यता दिसत आहे. या रस्त्यांची पाहणी करण्यासाठी शासनाने पालघर तालुक्यातील विविध भागासाठी अनेक इंजिनिअरची नेमणूक केली आहे. त्यांनी ठेकेदारांकडून उत्तम प्रकारचे मटेरियल वापरून चांगले टिकावू रस्ते तयार करून घ्यावे. ठेकेदार, इंजिनिअर व संबंधीत वरिष्ठ अधिकारी यांची मिलीभगत असून कोणीही रस्त्यावर लक्ष केंद्रीत करत नाही. ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं’ अशी परिस्थिती सध्या दिसत आहे. ठेकेदारांचे बिल शासनाने थांबवावे तसेच नेमलेले इंजिनिअर व अधिकार्यांवर कठोर शासन करावे, अशी परिसरातून जनतेची मागणी आहे. याबाबत अधिक माहितीसाठी अभियंता आर. एस. लोहार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, रस्त्याचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. पावसाच्या अगोदर हे काम पूर्ण करण्याकडे कल आहे. ज्या गावातील रस्ते निकृष्ट असतील त्या ठेकेदारांची बिले पास करण्यात येणार नाहीत, अशी उडवाउडवीची उत्तरे त्यांनी दिली. (वार्ताहर)