पंतप्रधान दौ-यासाठी रस्ते चकाचक
By Admin | Updated: August 16, 2014 00:27 IST2014-08-16T00:27:26+5:302014-08-16T00:27:26+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उरण जेएनपीटी दौऱ्याच्या निमित्ताने जेएनपीटी परिसरातील खड्डे पडलेले रस्ते चकाचक करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे.

पंतप्रधान दौ-यासाठी रस्ते चकाचक
चिरनेर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उरण जेएनपीटी दौऱ्याच्या निमित्ताने जेएनपीटी परिसरातील खड्डे पडलेले रस्ते चकाचक करण्याचे काम युध्द पातळीवर सुरु आहे. तर रस्त्यांच्या कडेला शेकडो झाडे लावून परिसर हिरवागार करण्यात आला आहे.
मोदींच्या दौऱ्यानिमित्ताने उरण जेएनपीटीजवळच्या शेकडो टपऱ्या, ढाबे हटवण्यात आले आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजविले जात आहेत. त्याचप्रमाणे नेहमीच रस्त्यांवर ठाण मांडणाऱ्या आणि वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणाऱ्या कंटेनर ट्रेलरना परिसरात एन्ट्री नाकारण्यात आली आहे. त्यामुळे जेएनपीटी प्रकल्पापासून ते स्पीडी कंटेनर यार्डपर्यंतचा परिसर सुनियोजित विभागासारख्या दिसू लागला आहे.
जेएनपीटीचा परिसरातील दुभाजकांचेही सुशोभिकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या कडेला साडेचौदा लाखांचा खर्च करुन पाम वृक्षाची झाडे लावण्याचे काम युध्द पातळीवर करण्यात आले आहे. जेएनीपटीने खर्चाची कोणतीच तमा न बाळगता कोटींच्या कोटींची उड्डाणे घेतल्याची माहिती मिळत आहे.
सभेच्या ठिकाणी नागरिकांना बसण्यासाठी उभारलेल्या मंडपासाठी ३ कोटी ७० लाख रुपयांचा खर्च करण्यात आला आहे. निमंत्रणपत्रिका, व्हीआयपींसाठी शंभर गाड्यांची व्यवस्था, मुंबईतून येण्यासाठी २५ स्पीड बोटींची व्यवस्था आदी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जेएनपीटीचे कामगार नियुक्त विश्वस्त दिनेश पाटील यांनी दिली. (वार्ताहर)