निधी, नियोजनाअभावी खोळंबले रस्त्याचे काम!

By Admin | Updated: March 31, 2015 22:32 IST2015-03-31T22:32:32+5:302015-03-31T22:32:32+5:30

बोईसर ते तारापूर व नवापूर नाका ते एम.आय.डी. सी या दोन मुख्य व महत्वाच्या रस्त्यांना जोडणारा बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर या सर्वात मोठ्या गृहसंकुलातून

Road work due to funds, planning wastage! | निधी, नियोजनाअभावी खोळंबले रस्त्याचे काम!

निधी, नियोजनाअभावी खोळंबले रस्त्याचे काम!

पंकज राऊत, बोईसर
बोईसर ते तारापूर व नवापूर नाका ते एम.आय.डी. सी या दोन मुख्य व महत्वाच्या रस्त्यांना जोडणारा बोईसर येथील ओस्तवाल एम्पायर या सर्वात मोठ्या गृहसंकुलातून जाणाऱ्या दोन जोड रस्त्यापैकी एका रस्त्याचे काम सुमारे ४४ लाख रू. खर्चून करण्यात आले. मात्र, त्याच रस्त्याला जोडून असलेल्या आणि तेवढ्याच लांबीच्या दुसऱ्या रस्त्याचे काम निधी व नियोजनाअभावी रखडल्याने नागरीकांना आणि वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने अखेर ओस्तवालच्या नागरीकांनी पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री विष्णू सवरा यांना साकडे घातले आहे.
ओस्तवाल एम्पायर फेडरेशनच्या वतीने अध्यक्ष नागेश राऊळ, उपाध्यक्ष वैभव संखे व अनंत दळवी तसेच नेमिनाथ चे अध्यक्ष राजू संखे यांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे बोईसर शहर अध्यक्ष वैभव संखे यांनी अशी दोन स्वतंत्र निवेदने पालकमंत्र्यांना दिली आहेत. या निवेदनात बोईसर ग्रामपंचायतीने निधी नसल्याचे कारण सांगून दुसरा जोड रस्ता करण्यास असमर्थता दर्शविल्याने आपण निधी देऊन रस्त्याचा प्रश्न सोडविण्याची विनंती केली आहे तर राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष वैभव संखे यांनी ओस्तवाल एम्पायर या गृहसंकुलातून वर्षाकाठी घरपट्टी व दिवाबत्तीच्या माध्यमातुन सुमारे चाळीस लाख रू. चा महसूल मिळतो तर हा रस्ता दुरूस्त करीता पुरूषोत्तम मानधना या उद्योजकाने सहा लाखांचा निधी ग्रामपंचायतीला दिला असून ओस्तवाल मधील प्रत्येक दुकानदाराने तीन हजार ग्रामपंचायतीला दिले आहेत. असे असतानाही निधी नाही व इतर तथ्यहीन कारणे पुढे करून रस्त्याचे काम खोळंबवून ठेवले असून रस्ता दुरूस्ती करीता आपण स्वत: ओस्तवालचे रहिवासी, ग्रामपंचायत, बीडीओ व पोलीस अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती करण्यात आली आहे.
या संदर्भात बोईसर ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी पंकेश संखे यांच्याशी संपर्क साधला असता ओस्तवालच्या नागरीकांनी रस्ता बांधणीसाठी रास्ता रोको चा इशारा दिला होता. त्यानंतर झालेल्या बैठकीत येथील रहिवाशांच्या प्रतिनिधींनी ओस्तवाल गृहसंकुलातील थकीत चाळीस लाख रू. ची घरपट्टी आम्ही वसूली करून देण्यास मदत करू तुम्ही चांगला व मजबूत रस्ता बांधणीचे काम सुरू करा अशा दिलेल्या आश्वासनानंतर ग्रामपंचायतीने ४४ लाख रू. अंदाजीत खर्च अपेक्षीत धरून एक मार्गी काँक्रीट रस्ता (ट्रीमिकस) पद्धतीने तयार केला त्या तयार रस्त्याच्या कामाचे बहुतांश बील अदा करणे बाकी आहे. त्यामुळे निधी अभावी दुसऱ्या जोड रस्त्याचे काम खोळंबले आहे तर अनेक वेळा पायपीट करून ओस्तवाल मधून घरपट्टी फक्त साडे दहा लाख रू. जमा झाली तर दुकानदारांकडून सव्वा लाखाचा निधी मिळाला असल्याचे सांगून मानधनांकडून मिळालेल्या सहा लाखाचा निधी पावसाळ्यापूर्वी खडीकरण व रस्ता दुरूस्तीसाठी खर्च करण्यात आला आहे, असे सांगितले.

Web Title: Road work due to funds, planning wastage!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.