Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस व खड्ड्यांमुळे रस्ते वाहतुकीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2018 04:09 IST

गेल्या आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत गाळदेखील अनेक ठिकाणी रस्त्यावर आला होता. तर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते वाहतूक संथ झाली आहे.

मुंबई -  मुंबई व परिसरात रविवारीदेखील पावसाचा जोर असल्याने व रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे मुंबईतील रस्ते वाहतुकीला काहीसा ब्रेक लागल्याचे चिन्ह होते. गेल्या आठवड्यात मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहासोबत गाळदेखील अनेक ठिकाणी रस्त्यावर आला होता. तर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मोठ्या प्रमाणात पडलेल्या खड्ड्यांमुळे रस्ते वाहतूक संथ झाली आहे.मुंबईतील रस्त्यांवरील वाढलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना ब्रेक लावणे भाग पडले आहे. काही ठिकाणी मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने या खड्ड्यांमधून मार्ग काढणे वाहनचालकांसाठी जिकिरीचे झाले आहे. त्यातच या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले असल्याने वाहनचालकांना हे खड्डे नेमके किती खोल आहेत याचा अंदाज येत नसल्याने हे खड्डे धोकादायक बनले आहेत.रविवारी रस्त्यांवर जास्त वाहतूक नसल्याने प्रवाशांना जास्त त्रास झाला नाही, मात्र खड्ड्यांची दुरुस्ती लवकर केली नाही तर गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची भीती नाकारता येत नाही. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन खड्डे बुजवावेत, अशी मागणी प्रवाशांमधून करण्यातयेत आहे.दरम्यान, मुसळधार पाऊस व खराब हवामानामुळे मध्य रेल्वे प्रशासनाने रविवारी जाहीर केलेला मेगाब्लॉक रद्द केल्याने रेल्वे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला.शनिवारी मध्यरात्रीपासूनच पावसाचा जोर वाढला. मुंबई शहराऐवजी मुंबईच्या पूर्व उपनगरात पावसाचा जोर अधिक होता. मध्यरात्री कोसळलेल्या पावसाने पहाटे काही काळ विश्रांती घेतली. मात्र, पुन्हा सकाळी सुरू झालेल्या मुसळधार पावसाने शहरासह उपनगराला गारद केले. मुसळधार पावसामुळे भायखळा रेल्वे स्थानक परिसर, परळ हिंदमाता, माटुंगा गांधी मार्केट, कुर्ला पश्चिमेकडील शीतल सिनेमा आणि कमानी रस्त्यावरील काजूपाडा जोडरस्ता, अंधेरी पूर्वेकडील मरोळ अशा सखल भागांत पाणी साचले होते. याचा फटका डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, लाल बहादूर शास्त्री मार्ग, कुर्ला-अंधेरी रस्ता, सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडवरील वाहतुकीला बसला. रविवार असल्याने रस्त्यावरील वाहनांची संख्या कमी होती, तरीही सखल भागांत साचलेल्या पाण्यामुळे ठिकठिकाणच्या वाहतूककोंडीत वाढ झाली होती. रविवारी सकाळी वडाळा, धारावी, विक्रोळी, कुर्ला, मरोळ, गोरेगाव, दिंडोशी, भायखळा, मुंबई सेंट्रल, हाजीअली, कुलाबा, मालवणी परिसरात मुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या.

टॅग्स :मुंबईपाऊस