रस्ता दुरूस्तीची कामे वाहतुकीच्या मुळावर
By Admin | Updated: May 12, 2014 05:39 IST2014-05-11T20:31:14+5:302014-05-12T05:39:22+5:30
वाहतूक कोंडी कल्याण डोंबिवलीकरांसाठी नित्याचीच झाली असताना यात महापालिकेकडुन सुरू असलेल्या रस्ता दुरूस्तीच्या कामांची भर पडली आहे. सिमेंट काँक्रिटीकरण, भुयारी गटार योजना आणि पाण्याच्या पाईपलाइन टाकणे आदी कामे सुरू असल्याने मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे.

रस्ता दुरूस्तीची कामे वाहतुकीच्या मुळावर
कल्याण : वाहतूक कोंडी कल्याण डोंबिवलीकरांसाठी नित्याचीच झाली असताना यात महापालिकेकडुन सुरू असलेल्या रस्ता दुरूस्तीच्या कामांची भर पडली आहे. सिमेंट काँक्रिटीकरण, भुयारी गटार योजना आणि पाण्याच्या पाईपलाइन टाकणे आदी कामे सुरू असल्याने मुख्य मार्गांसह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाला आहे. पालिकेच्या नियोजनशून्य आणि संथगती कारभारामुळे एकप्रकारे दुरूस्तीची कामे वाहतुकीच्या मुळावर आली आहेत.
कल्याण -डोंबिवली शहरातील २३ मुख्य रस्ते सिमेंट काँक्रिटीचे केले जाणार आहेत.यातील बहुतांश रस्त्यांची कामे सुरूही झाली आहेत. परंतु, संबंधित प्रकल्प विभागाच्या उदासीन कारभारामुळे ही कामे धीम्यागतीने सुरू आहेत.डोंबिवली शहरातील घरडा सर्कल ते टिळक चौक या मार्गावरील काम याचे उत्तम उदाहरण आहे. हा रस्ता रेल्वे स्थानक परिसराला जोडणारा असल्याने यावरून मोठया प्रमाणावर वाहतूक होत असते. नजीकच्या भागात महाविद्यालये, शाळा, रूग्णालये यांसह महत्वाचे चौक असल्याने येथे सदैव वर्दळ असते. दरम्यान भुयारी गटार योजना, पाण्याची पाईप लाइन टाकणे याचबरोबर आता रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची कामे सुरू असल्याने हा रस्ता गेल्या अडीच वर्षापासून खोदकाम केलेल्या अवस्थेत आहे. याचा फटका वाहतुकीला पर्यायाने त्यातून प्रवास करणा-या नागरीकांना तसेच रस्त्यावरून जाणा-या पादचा-यांना बसत आहे. हीच स्थिती कोपररोड,मानपाडा रोड, राजाजीपथ, पाटकर रोड आणि रामनगर या ठिकाणीही पहावयास मिळत आहे.दुसरीकडे कल्याणमध्येही अशा कामांमुळे बहुतांश रस्ते खड्डयात गेल्याने तेथेही वाहतुकी कोंडीचे चित्र दिसून येते. येथील संतोषीमाता रोड, मुरबाड रोड, बेतुरकरपाडा, पौर्णिमा चौक, खडकपाडा याठिकाणी ही कामे सुरू आहेत. दरम्यान पावसाळा नजिक येऊन ठेपला असून कामांची गती अशीच राहीली तर ऐन पावसाळयात परिस्थिती अधिकच गंभीर बनण्याची चिन्हे आहेत.
-----------------------
ते प्रस्ताव आचारसंहीतेच्या कचाटयात
सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामांबरोबरच शहरात विद्युत विभाग आणि मोबाईल कंपन्यांनी भूमिगत वाहिन्या टाकण्यासाठी बहुतांश ठिकाणी खोदकाम केल्याने रस्त्यांची दुरावस्था झाली आहे.या खोदलेल्या रस्त्यांचे खडीकरण आणि डांबरीकरण करण्यासाठी या कामांचे प्रस्ताव मान्यतेसाठी स्थायी समितीकडे पाठविण्यात आले होते. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहीता लागू असताना ते मंजूर केल्याने वादाच्या भोव-यात सापडले आहेत. या प्रस्तावांना निवडणूक आयोगाने स्थगिती दिल्याने पुढच्या प्रक्रियेला पुरती खीळ बसली आहे. यात खड्डेमय स्थिती जैसे थेच राहीली आहे.
-------------------------------------------------------
केडीएमसीचे शहर अभियंता पी. के. उगले यांच्याशी संपर्क साधला असता रस्त्यांच्या खोदकामांना १५ मेची डेडलाइन देण्यात आली आहे. त्यातच ३१ मे पर्यंत कामे पर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. पावसाळयापूर्वी रस्ते सुस्थितीत आणण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आचारसंहितेनंतर खडीकरणाच्या आणि डांबरीकरणाच्या कामांची ही तातडीने सुरूवात केली जाणार आहे.
(प्रतिनिधी)