Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत रात्रीच्या वेळी बुजवणार रस्त्यांवरील खड्डे; २२७ प्रभागांमध्ये अभियंत्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 10:37 IST

पावसाच्या दोन-चार दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकते.

मुंबई : पावसाच्या दोन-चार दिवस जोरदार सरी बरसल्यानंतर कुठल्या रस्त्यांवर खड्डे पडले हे समजू शकते. मात्र, दिवसा वाहनांची ये-जा सुरू असल्याने खड्यांचा शोध घेणे शक्य नाही. त्यामुळे ही शोधमोहीम रात्री घेण्यात आली आहे. कुठल्या रस्त्यावर खड्डे आहेत, हे स्पष्ट होताच तत्काळ खड्डे बुजवणे शक्य होणार आहे. त्यामुळे २२७ प्रभागांत सहायक रस्ते अभियंत्यांची नियुक्ती केली असून, एका अभियंत्याने १० किमी परिसरातील खड्ड्यांचा शोध घेत तत्काळ बुजवण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश दिल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.

दोन हजार ५० किमी लांबीचे रस्ते मुंबई पालिकेच्या अखत्यारीत आहेत. यंदा पाणी तुंबू नये, यासाठी योग्य ती खबरदारी घेतली आहे. तसेच पावसाळ्यात पडणारे खड्डे बुजवण्यासाठी दक्षता घेतली आहे. खड्यांच्या तक्रारीसाठी थेट हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. त्यामुळे मुंबईकरांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निवारण वेळीच होणार आहे. मात्र मुंबईतील वाहतूककोंडी पाहता, दिवसा खड्डा शोधणे आणि बुजवणे तातडीने शक्य नाही. खड्यांच्या तक्रारीसाठी हेल्पलाइन नंबर जारी केला असला तरी सहायक अभियंते जातीने लक्ष घालणार आहेत.

वाहतुकीसाठी 'सेफ स्टेज'मध्ये-

मुंबईत शहर, पूर्व व पश्चिम उपनगरा सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांसह काही रस्त्यांची कामे सुरू होती. परंतु पावसाळ्यापूर्वी रस्ते कामे पूर्ण करत रस्ते वाहतुकीसाठी सेफ स्टेज मध्ये आणा, असे आदेश दिले होते. त्याप्रमाणे बहुतांश कामे पूर्ण झाली असून रस्ते वाहतुकीसाठी 'सेफ स्टेज मध्ये आल्याची माहिती पालिकेने दिली.

तातडीने होणार कार्यवाही-

पालिकेच्या २२७ प्रभागांत अभियंत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एक अभियंता तीन दिवसांत १० किमी रस्त्यांवरील खड्डे शोध घेऊ शकतो आणि तातडीने बुजवण्याची कार्यवाही करू शकतो आणि तसे निर्देश सहायक अभियंत्यांना दिले आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकारस्ते सुरक्षामोसमी पाऊस