लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: 'रस्ते बांधकामाचे टेंडर काढा, रस्ता बनवा, तो खराब झाला की पुन्हा टेंडर काढा, हा नवा धंदा सुरू झाला आहे,' अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेवर टीका केली. शिवतीर्थ येथे गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याआधी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन मुंबई शहर नियोजनाचा लघुआराखडा सादर करत चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी या प्रश्नांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे राज यांनी सांगितले.
राज म्हणाले की, गेल्या काही महिन्यांपासून ते मुख्यमंत्र्यांशी शहर नियोजनासह विविध विषयांवर संवाद साधत आहेत. मुसळधार पावसामुळे पाणी साचणे, रस्त्यांवरील खड्डे, वाहतुकीतील अडचणी, अनधिकृत पार्किंग यांसारखे गंभीर मुद्दे असले तरी, या भेटीत वाहतुकीसंदर्भात विशेष चर्चा झाली. प्रेझेंटेशनवेळी वाहतुकीसंदर्भातील पोलिस आयुक्तही उपस्थित होते.
मुंबईतील पुनर्विकासामुळे लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. गाड्यांची संख्या, कचरा व दैनंदिन गरजा वाढल्या तरी सुविधा वाढलेल्या नाहीत. पार्किंगसाठी ठिकठिकाणी झोन ठळक रंगांनी दर्शविणे, मैदानांमध्ये पार्किंगची सोय करणे, नियम मोडणाऱ्यांवर दंड व तुरुंगवासासारख्या कठोर कारवाईची तरतूद करावी.
मुंबई शहरात एक आणि उपनगरांत दोन असे तीन पार्किंग झोन बनवण्याचे आराखडे दिले आहेत. त्यावर तज्ज्ञांची मदत व मते जाणून घेऊन उपाययोजना कराव्यात, अशा सूचना केल्याचे राज यांनी सांगितले.
बेस्ट पतपेढीचा विषय छोटा
स्थानिक पातळीवर बेस्ट पतपेढीसारख्या निवडणुकांचे निर्णय घेतले जातात. त्याबाबत काही माहिती नाही. हा विषय अत्यंत छोटा असल्याचे सांगत राज यांनी याबाबत अधिक भाष्य करणे टाळले.
अनावश्यक विषयावर राजकारण
कबुतर, हत्ती या विषयांमध्ये अडकल्यामुळे इतर गोष्टींवर लक्ष राहिले नाही. माणूस मेला तरी चालेल, पण कबुतरे वाचली पाहिजेत यात राजकारण आहे. आवश्यक नसलेले विषय न दाखविल्यास त्यावर राजकारणच होणार नाही. त्यामुळे विषय वाढवू पाहणारे गप्प बसतील, असे राज म्हणाले.
ए पिल्लू... इकडे ये!
पत्रकार परिषद सुरू असतानाच राज यांचा पाळीव कुत्रा समोर आल्याने उपस्थितांच्या नजरा तिकडे वळल्या. त्याला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हलके स्मित फुलले. 'ए पिल्लू...इकडे ये... वरती ये,' असे म्हणत त्यांनी त्याला जवळ बोलावले. काही क्षण त्याचे कान कुरवाळून लाड केल्यानंतर तो निघून गेला. त्याचे नाव 'रायनो' असल्याचे त्यांनी सांगितले.