Join us  

आर.के. स्टुडिओच्या जागी आता आलिशान इमारती

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2019 6:49 AM

मालकी गोदरेज प्रॉपर्टीजकडे : गेल्या वर्षी आगीत झाले होते नुकसान

मुंबई : स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतरच्या दर्जेदार हिंदी चित्रपटांचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या आर. के. स्टुडिओजच्या जागी आता आलिशान इमारती उभ्या राहणार आहेत. या ऐतिहासिक वास्तूची जागा गोदरेज प्रॉपर्टीजने विकत घेतल्याने त्यावरील कपूर कुटुंबाची मालकी संपुष्टात आली आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजने हा स्टुडिओ खरेदी केल्याची अधिकृत घोषणा नुकतीच केली. येत्या काळात आर.के. स्टुडिओच्या ३३ हजार वर्गमीटर क्षेत्रात आधुनिक निवासी इमारती बांधण्यात येतील, अशी माहिती गोदरेज प्रॉपर्टीजने दिली. रणधीर कपूर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला. स्टुडिओच्या जागेवर नवीन बांधकाम करण्यासाठी आम्ही गोदरेज प्रॉपर्टीज कंपनीला निवडले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

गतवर्षी सप्टेंबर महिन्यात या स्टुडिओच्या स्टेज नंबर १ वर ‘सुपर डान्सर’ या डान्स रिअ‍ॅलिटी शोचा सेट उभारण्यात आला होता. त्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती. आधी सेटवरच्या पडद्यांनी पेट घेतला आणि मग स्टेज जळून खाक झाला. काहीच क्षणात स्टुडिओच्या अन्य भागांत ही आग पसरली होती. या आगीत अनेक जुन्या आठवणी क्षणात नष्ट झाल्या होत्या. ऋषी कपूर यांनी याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले होते. यानंतर काहीच महिन्यांत हा स्टुडिओ विकण्याचा निर्णय कपूर कुटुंबाने घेतला होता.

आर.के. स्टुडिओला लागलेल्या भीषण आगीनंतर स्टुडिओचे आणि त्यात संग्रहित केलेल्या स्मृतींचेही अतोनात नुकसान झाले. आता तो पुन्हा उभा करणे शक्य नाही, त्यामुळे स्टुडिओ विकणे योग्य ठरेल, असा निर्णय आम्ही सर्वानुमते घेतला, असे यादरम्यान ऋषी कपूर यांनी स्पष्ट केले.

राज कपूर यांनी केली स्थापना‘शो मॅन’ राज कपूर यांनी या स्टुडिओची स्थापना केली होती. या स्टुडिओने चित्रपटसृष्टीचा सुवर्णकाळ पाहिला. आवारा (१९५१), आग (१९५३), श्री ४२० (१९५५), त्यानंतर आलेले जागते रहो, जिस देश मे गंगा बहती है, सत्यम शिवम सुंदरम, प्रेम रोग, राम तेरी गंगा मैली, हिना, प्रेमग्रंथ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे. या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम आर. के. स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले गेले होते. पण आगीत ते भस्मसात झाले.

टॅग्स :आर के स्टुडिओमुंबई