Join us

रिया चक्रवर्तीची होणार उलट तपासणी, ‘त्या’ कंत्राटाबाबतही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2020 03:56 IST

रिया हिचा वांद्रे पोलिसांनी गुरुवारी जबाब नोंदविला. जवळपास नऊ तास तिची चौकशी केली.

मुंबई : सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आतापर्यंत तेरा जणांचे जबाब नोंदविले आहेत. यात त्याची मैत्रीण, अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिचादेखील समावेश असून, तिची उलट तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आहे. रिया हिचा वांद्रे पोलिसांनी गुरुवारी जबाब नोंदविला. जवळपास नऊ तास तिची चौकशी केली. तिच्याआधी आणि नंतर ज्या लोकांचे जबाब नोंदविले आहेत, ते सर्व पुन्हा पडताळून पाहिले जात आहेत. त्यानुसार, त्यात जर काही तफावत आढळली, तर पुन्हा रियाच्या उलटतपासणीदरम्यान ते स्पष्ट होईल, असा पोलिसांना संशय आहे.

रिया आणि सुशांत लग्न करणार होते, असे तिने म्हटले आहे. मात्र, नंतर त्यांच्यात वाद झाले आणि ती त्याला सोडून गेली. मात्र, तरी त्याच्या संपर्कात होती, असे तिने पोलिसांना सांगितले आहे, तसेच एका मोठ्या बॅनरसोबत करण्यात आलेल्या कंत्राटाबाबत तो थोडा चिंतेत होता. कारण त्याला रिप्लेस होण्याची भीती होती.

त्यानुसार, पोलिसांनी संबंधित बॅनरचे पेपर तपासणीसाठी मागितले आहेत. त्यावरून त्यात कोणत्या अशा अटी होत्या, ज्यामुळे सुशांत तणावात होता, हे उघड होईल. दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांनी अद्याप या प्रकरणी कोणतीही तक्रार दाखल केली नसून, त्याच्या आत्महत्येमागील कारण शोधण्यासाठी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

टॅग्स :सुशांत सिंग रजपूत