Join us  

विमान उड्डाणाला धोका, जागा रिकामी करण्याची ताकीद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2020 1:41 AM

कुर्ला घाटकोपरमधील झोपड्यांना नोटीस : जागा रिकामी करण्याची ताकीद

मुंबई : विमान उड्डाणांना धोकादायक असल्याने फनेल झोनमधील कुर्ला, घाटकोपर पश्चिम येथील १७३ झोपडीधारकांना महापालिकेने एका आठवड्यात जागा रिकामी करण्याची ताकीद दिली आहे. या कारवाईमुळे या परिसरातील शेकडो कुटुंबीयांवर बेघर होण्याची वेळ आली आहे. या कारवाईला सत्ताधारी शिवसेनेने विरोध दर्शविला आहे. पालिकेने या नोटीस मागे घ्याव्यात, अशी मागणीही केली जात आहे.

कुर्ला पश्चिम आणि घाटकोपर पश्चिम परिसरातील रहिवाशांना पालिकेच्या एल विभागाच्या सहायक आयुक्तांनी ३५१-कलमांतर्गत नोटिसा पाठविल्या आहेत. शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे यांनी सुधार समितीच्या बैठकीत ही माहिती हरकतीचा मुद्द्याद्वारे दिली. या ठिकाणी असलेले रहिवासी १९७२ पासून वास्तव्य करीत आहेत. पालिका प्रशासनाकडून संबंधित रहिवाशांकडे १९६४च्या वास्तव्याचे पुरावे मागितले जात आहेत. कुर्ला-घाटकोपरमधील मुकुंदराव आंबेडकरनगर, हनुमान टेकडी, जरीमरी, संजयनगर, अशोकनगर आदी भागांतील झोपडीधारकांना अशा नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.विमानतळाचे व्यवस्थापन पाहणाऱ्या जीव्हीके कंपनीच्या सांगण्यावरून या नोटिसा देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. विलेपार्ले विभागात जीव्हीके कंपनीकडून मनमानीपणे झोपड्यांची मोजणी करून रहिवाशांवर अन्याय केला जात असल्याचे भाजपचे अभिजित सावंत यांनी सांगितले. संबंधित कंपनीची मोजणी संशयास्पद असल्याचेही ते म्हणाले. पालिकेने या नोटिसा तातडीने मागे घ्याव्यात, अशी मागणीही सर्वपक्षीय सदस्यांनी केली.‘आधी पुनर्वसनाची हमी द्यावी’च्प्रशासनाने तातडीने स्पष्टीकरण द्यावे, अन्यायकारक नोटिसा मागे घ्याव्या, असे आदेश सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब यांनी दिले. संबंधित रहिवाशांना आधी पुनर्वसनाची हमी द्यावी, असे त्यांनी बजावले.च्संबंधित प्रकाराची चौकशी करण्यात येईल, अयोग्य पद्धतीने नोटीस पाठविण्यात आली असेल, तर मागे घेण्यात येतील, असे आश्वासन उपायुक्त रमेश पवार यांनी दिले.

टॅग्स :विमानमुंबई