महापौर दालनाबाहेर दंगा
By Admin | Updated: January 6, 2015 02:25 IST2015-01-06T02:25:47+5:302015-01-06T02:25:47+5:30
महासभा सुरू असतानाच बारमालकांची भेट घेणाऱ्या महापौरांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने चक्क बीअरचे बॉक्स महापौरांना भेट देण्याचा प्रयत्न केला.

महापौर दालनाबाहेर दंगा
ठाणे : महासभा सुरू असतानाच बारमालकांची भेट घेणाऱ्या महापौरांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीने चक्क बीअरचे बॉक्स महापौरांना भेट देण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनाचा गोंधळ निर्माण झाल्याने या बॉक्समधील बीअरचे टीन महापौर कार्यालयाच्या दारातच फुटले. त्यामुळे पालिका मुख्यालयात मद्याचा दरवळ पसरला होता. राष्ट्रवादीच्या या कृत्याचा निषेध नोंदवून आंदोलनकर्त्यांच्या विरोधात महापौर संजय मोरे यांनी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला
आहे.
पालिकेच्या प्रवेशद्वारावर आणि महापौर कार्यालयाबाहेर अडवणाऱ्या सुरक्षारक्षकांना आंदोलकांनी धक्काबुक्की केली. या धक्काबुक्कीमध्ये राष्ट्रवादीचा एक नगरसेवकही सहभागी होता. ठाणे महापालिकेची खंडित महासभा २९ डिसेंबर रोजी होती. या वेळी पालिकेच्या आर्थिक स्थितीवर सभागृहात चर्चा सुरू असताना ही चर्चा सोडून महापौर आणि आयुक्तांनी बारमालकांच्या बैठकीला प्राधान्य दिले होते. याचा निषेध म्हणून विरोधकांनी सभागृहात गोंधळ घालून महापौरांसह प्रशासनाचा धिक्कार केला होता. त्यावर, आयुक्तांनी ते बारवाले नसून हॉटेल व्यावसायिक असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. परंतु, यावर विरोधकांचे समाधान झाले नाही.
स्थायी समितीच्या बैठकीतही या घटनेचा निषेध करून बैठक तहकूब करण्यात आली होती. या विरोधाचे सत्र आजही सुरूच असून त्याचा प्रत्यय सोमवारी पुन्हा आला. कार्यतर्त्यांनी निषेध केला तेव्हा, महापौर कार्यालयात नसल्याने सुरक्षारक्षकांनी आंदोलकांना अडवले. त्या वेळी या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करून मद्याचा बॉक्स महापौरांच्या दारातच फोडला. यामुळे, पालिका मुख्यालयात मद्याचा दरवळ सुटला होता. अचानक घडलेल्या या प्रकाराने पालिका यंत्रणाही हादरली.
काही वेळाने आलेल्या महापौर संजय मोरे यांनी राष्ट्रवादीच्या या कृत्याची निंदा करून असल्या घाणेरड्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करणार, अशी टीका केली. तसेच, या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याचे सांगून पोलिसात गुन्हा दाखल केला
आहे. (प्रतिनिधी)
आमदार जितेंद्र आव्हाड यांनी पालिकेतील या कृत्याचा निषेध नोंदविल्यानंतर राष्ट्रवादीचे नगरसेवक अमित सरय्या आणि युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष संदीप जाधव आदींच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी महापौरांचा निषेध चक्क मद्याच्या बाटल्यांचा बॉक्स देऊन केला.