खंडणीबहाद्दर बिगाऱ्याला मुंबईत अटक
By Admin | Updated: November 30, 2015 02:13 IST2015-11-30T02:13:34+5:302015-11-30T02:13:34+5:30
बिल्डरकडे काम करणाऱ्या गणेश बाळकृष्ण नाईक उर्फ भाऊ (५६) या मजूराने स्वत:ची टोळी तयार करून खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला

खंडणीबहाद्दर बिगाऱ्याला मुंबईत अटक
मुंबई : बिल्डरकडे काम करणाऱ्या गणेश बाळकृष्ण नाईक उर्फ भाऊ (५६) या मजूराने स्वत:ची टोळी तयार करून खंडणी उकळण्याचा प्रकार उघडकीस आला असून त्याच्यासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. रवी पुजारी आणि छोटा शकील या गॅगस्टरच्या नावाने या टोळीने धमक्या दिल्या होत्या.
श्रीनिवास शिरसपैया स्वामी उर्फ रघु शेट्टी (३२) , शैलेश मार्केडेय हुप्ता (२४), सिध्देश सुधाकर मोरे उर्फ अण्णा (२७) आणि नितेश कोमू उर्फ राज (२५) अशी अटक केलेल्या अन्य आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर खंडणी, मारहाण, हत्या, हत्येचा प्रयत्न आदी गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. खार येथील रहिवाशी असलेले नामांकित बांधकाम व्यावसायिक यांचे मुंबईत अनेक ठिकाणी इमारतींचे बांधकाम सुरु आहेत. गेल्यावर्षी टोळीने व्यावसायिकाच्या मॅनेजरचे दोनवेळा अपहरण करुन रवी पुजारी आणि छोटा शकीलच्या नावाने ४० लाख रुपये उकळले होते. २४ नोव्हेंबरला त्यांच्या कळंबोली येथील बांधकाम साईटवरुन घरी निघालेल्या मॅनेजरचे अपहरण करुन ७५ लाखांची खंडणी व्यावसायिकाकडे मागितली. मात्र २५ नोव्हेंबरला गुरुनानक जयंती असल्याने बँक बंद आहेत. ‘तुम्ही त्याची सुटका करा, पैसे गुरुवारी देतो’ असे त्यांनी सांगितले. यापूर्वी दोन वेळा व्यावसायिकाकडून रक्कम मिळाली असल्याने गुंडांनी २५ नोव्हेंबरला सकाळी मॅनेजरची सुटका केली. गुरुवारी सकाळपासून या टोळीने पैशांची मागणीचा पिच्छा पुरविला. त्यामुळे त्यांनी खार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. ठरल्याप्रमाणे सुरुवातीला १० लाख रुपये देण्याचे आमिष दाखवून आरोपींना खार येथील वृंदावन हॉटेलकडे बोलावण्यात आले. तेथे पैसे घेण्यासाठी आलेल्या मास्टरमाईड नाईकसह पाच जणांना खार पोलिसांनी सापळा रचून अटक केली. अटक आरोपींकडून ३ पिस्टल, ९ जिवंत काडतुसे, ३ चाकू, ७ मोबाईल फोन, मोटार सायकलसह अपहरणासाठी वापरलेली ओमनी मोटर टॅक्सी हस्तगत करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)