६ लाख ८७ हजार ६१३ मतदार बजावणार हक्क
By Admin | Updated: June 8, 2015 22:44 IST2015-06-08T22:44:00+5:302015-06-08T22:44:00+5:30
महानगरपालिकेच्या एकुण ११५ जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्याने १४ जूनला १११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये ६ लाख ८७ हजार ६१३ मतदार आपला हक्क बजावणार आहे.

६ लाख ८७ हजार ६१३ मतदार बजावणार हक्क
वसई : महानगरपालिकेच्या एकुण ११५ जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्याने १४ जूनला १११ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये ६ लाख ८७ हजार ६१३ मतदार आपला हक्क बजावणार आहे. त्यापैकी ३ लाख १३ हजार ५१८ महिला तर, ३ लाख ७४ हजार ३५ पुरुष मतदार आहेत. एकुण ६०७ मतदानकेंद्रावर मतदान होणार आहे.
प्रभाग क्र. २०, प्रभाग क्र. ३७, प्रभाग क्र. ७८ व प्रभाग क्र. ८३ मध्ये बहुजन विकास आघाडीच्या चार महिला बिनविरोध निवडून आल्या. त्यामुळे या ४ प्रभागातील एकूण २३ हजार ६८० मतदार व २० मतदानकेंद्रे कमी झाले आहेत. या महिला बिनविरोध होण्यापूर्वी एकूण मतदार ७ लाख ११ हजार २९३ इतके होते तर मतदानकेंद्राची संख्या ६२७ होती. सर्वाधिक मतदार प्रभाग क्र. ८३ मध्ये आहे. या प्रभागात सुमारे १४ हजार २८४ मतदार १२ मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या प्रभागातील मतदारांची संख्याही सर्वाधिक आहे तर सर्वात कमी मतदारसंख्या प्रभाग क्र. ७८ मध्ये आहे. एकूण १ हजार ५५० मतदार केवळ २ मतदानकेंद्रावर मतदान करणार आहेत. प्रभाग क्र. ८० मध्ये पुरूष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. या ठिकाणी महिला ५ हजार २३३ तर, पुरूष मतदार ३ हजार ९३५ इतके आहेत. प्रभाग क्र. ८० प्रमाणे प्रभाग क्र. १०९ व ११० मध्ये पुरूषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
काही मतदान केंद्रासंदर्भात तक्रारी व सूचना आल्यामुळे ते मतदानकेंद्रे बदलण्यात आले आहेत. नालासोपारा पश्चिम भागात मतदानाच्या दिवशीच आठवडे बाजार असल्यामुळे मतदारांना मतदानासाठी जाताना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेऊन येथील मतदानकेंद्रे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मतदानकेंद्रावर योग्य त्या सुविधा उपलब्ध करण्याकरिता महानगरपालिकेत सर्व संबंधित शासकीय विभागाच्या बैठका आयोजित करण्यात आल्या. मतदानाच्या दिवशी वीजपुरवठा खंडित होऊ नये, याकरिता महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)