मुंबई हद्दीबाहेरही रिक्षा धावू शकतात
By Admin | Updated: December 23, 2014 01:31 IST2014-12-23T01:31:27+5:302014-12-23T01:31:27+5:30
मुंबईत धावणाऱ्या रिक्षा या ठाणे आणि त्यापलीकडेही धावू शकतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती वडाळा आरटीओ अधिकारी अजरी यांनी दिली.

मुंबई हद्दीबाहेरही रिक्षा धावू शकतात
मुंबई : मुंबईत धावणाऱ्या रिक्षा या ठाणे आणि त्यापलीकडेही धावू शकतात, अशी महत्त्वपूर्ण माहिती वडाळा आरटीओ अधिकारी अजरी यांनी दिली.
हद्दीवरून अनेक रिक्षाचालकांचा प्रवाशांशी वाद होतो. तसेच अन्य रिक्षाचालकांशीही वैर निर्माण होते. हे पाहता रिक्षाचालक, प्रवासी यांचा गैरसमज दूर व्हावा यासाठी मुलुंड चेकनाका येथे वडाळा आरटीओकडून एक शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात मुलुंडचे वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकारी रेपाळे तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजाराम माने आणि रिक्षाचालक-मालक संघटनेचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी आरटीओ अधिकारी अजरी यांनी सांगितले की, एमएमआरटीएचे क्षेत्र हे पेणपर्यंत असून रिक्षा या हद्दीपर्यंत धावू शकतात. त्यामुळे रिक्षाचालकांनी हद्द न ठेवता प्रवाशांची होणारी गैरसोय कशी टाळता येईल याचा विचार करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यामुळे हद्दीचा वाद टाळा आणि प्रवाशांना सेवा द्या, असा संदेश यावेळी देण्यात आला. त्याचप्रमाणे हद्दीबाहेर जाताना चालकांनी युनिफॉर्म परिधान करतानाच सोबत कागदपत्रे, बॅजही ठेवावेत, असा सल्लाही देण्यात आला. महत्त्वाची बाब म्हणजे प्रवाशांची सेवा हेच आपले उद्दिष्ट असल्याचे चालकांनी लक्षात ठेवावे, असेही ते म्हणाले.
या वेळी उपस्थित रिक्षाचालक-मालक संघटनांकडूनही आपले मत व्यक्त करताना चालकांना कधी कधी खोटे आरोप आणि तक्रारी केले जात असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याची पूर्ण शहानिशा केली जावी, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली.