पनवेलमधील रिक्षामीटर ‘अप’च

By Admin | Updated: May 11, 2015 01:48 IST2015-05-11T01:48:45+5:302015-05-11T01:48:45+5:30

पनवेल परिसरातील रिक्षा व्यावसायिक अजूनही मीटर न टाकता व्यवसाय करत असल्याने प्रवासी मात्र मीटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

Rickshawm 'Up' in Panvel | पनवेलमधील रिक्षामीटर ‘अप’च

पनवेलमधील रिक्षामीटर ‘अप’च

कळंबोली : राज्यभरातील बहुतांश शहर व उपनगरांमध्ये रिक्षा व्यावसायिकांचे मीटर सुरू असून, त्यानुसार भाडे आकारले जात आहे. परंतु पनवेल परिसरातील रिक्षा व्यावसायिक अजूनही मीटर न टाकता व्यवसाय करत असल्याने प्रवासी मात्र मीटर सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. वाहतूक पोलीस आणि आरटीओकडून याबाबत ठोस पाऊले उचलली जात नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. परिणामी पनवेलकरांची मोठी लूट होत असून ते त्रस्त झाले आहेत. प्रवासी संघटनेचा एकाकी लढा सुरू असून त्यांना इतरांचा प्रतिसाद मिळत नसल्याने रिक्षावाल्यांचे फावते आहे.
नियमानुसार रिक्षामध्ये मीटर सुरू असणे बंधनकारक आहे. यातून पारदर्शक व्यवहाराला मदत होण्याबरोबरच रिक्षा व्यावसायिक व प्रवाशांचे नातेही सलोख्याचे राहते. परंतु सद्यस्थितीला पनवेल आणि सिडको वसाहतीत शहरात काही रिक्षा व्यावसायिकांकडून भरमसाठ भाडे प्रवाशांकडून आकारले जाते. यामुळे प्रवाशांमधून नाराजी व संताप व्यक्त होत आहे. शहरातील नागरिकांना येथील रिक्षा व्यावसायिकांचा स्वभाव व दर आकारणीची पद्धत माहिती असली तरी बाहेरून येणाऱ्या मंडळी व प्रवाशांना या ठिकाणचे भाडे व प्रवास माहिती नसतो. त्यामुळे अनेकदा रिक्षा व्यावसायिक अधिकाधिक भाडे घेऊन पैसा मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आरटीओच्या नियमानुसार मीटर आकारणी बंधनकारक आहे. येथील बहुतांश रिक्षा व्यावसायिक शासनाचे सर्व कर भरण्याबरोबरच त्यांचे नियम व अटी पाळत आहेत. परंतु मीटर मात्र सुरू न करता रिक्षा वाहतूक करण्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. अनेकदा प्रवाशांकडून मागणी होऊनही रिक्षा व्यावसायिकांचे मीटर अपच आहेत. काही रिक्षा व्यावसायिकांशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रि या जाणून घेतली असता त्यांनी वाढती महागाई व गुंतवणूक यापेक्षा रिक्षा व्यवसाय आता अजिबात न परवडणारा बनला असल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. नोकरी नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हा व्यवसाय करावा लागत आहे. त्यांचे हे कारण पटण्यासारखे असले तरी सर्वसामान्य प्रवाशांची लूट करणे हे त्यावरील उत्तर नसल्याचे पनवेलकरांचे म्हणणे आहे. नवीन पनवेल, खांदा वसाहतीसह सिडको वसाहतीत कळंबोली, कामोठे, खारघरमध्ये रिक्षाचालकांची मनमानी कारभार सुरू असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)

एनएमटीला विरोध
अंतर्गत भागात बहुतांशी ठिकाणी वाहतुकीची सुविधा नसल्याने रिक्षाशिवाय पर्याय नव्हता. परिणामी प्रवाशांना रिक्षांनी प्रवास करावा लागत आहे. काही ठिकाणी एनएमएमटी सुरू करण्यात आलेली आहे, परंतु रिक्षाचालक या सेवेला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोध करीत असल्याने चारही बाजूने सर्वसामान्य प्रवाशांची कुचंबना होताना दिसत आहे. कामोठे वसाहतीत रिक्षावाल्यांनी धर्मराज पक्षाची मदत घेऊन एनएमएमटीला विरोध केला. आजही त्यांचा या ना त्या मार्गाने विरोध सुरू असून तुम्ही मीटरही टाकीत नाहीत आणि बसला विरोध करता, ही मनमानी नाही तर काय, असा सवाल प्रवाशांनी केला आहे. या संदर्भात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आनंद पाटील यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Rickshawm 'Up' in Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.