रिक्षा-टॅक्सी भाडेवाढे एक रुपयांनी वाढणार?
By Admin | Updated: May 7, 2015 02:56 IST2015-05-07T02:56:13+5:302015-05-07T02:56:13+5:30
हकिम समितीने केलेल्या शिफारसीनुसार यंदाही मुंबईकरांसमोर रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचे संकट उभे ठाकले आहे.

रिक्षा-टॅक्सी भाडेवाढे एक रुपयांनी वाढणार?
मुंबई : हकिम समितीने केलेल्या शिफारसीनुसार यंदाही मुंबईकरांसमोर रिक्षा-टॅक्सी भाडेवाढीचे संकट उभे ठाकले आहे. ११ मे रोजी एमएमआरटीएच्या बैठकीत यावर चर्चा होणार असून एक रुपयाने भाडे वाढवण्याची मागणी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी केली आहे.
वाढणारे इंधनाचे दर, देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आणि वाढती महागाई या सर्व घटकांचा विचार करता प्रत्येक वर्षाच्या १ मेपासून रिक्षा आणि टॅक्सींच्या भाड्यात वाढ करण्याची शिफारस हकिम समितीने केली आहे. ही शिफारस २७ जुलै २०१२ रोजी केल्यावर आॅक्टोबर २०१२ पासूनच रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात वाढ करण्यात आली होती. त्या वेळी रिक्षाचे भाडे १५ रुपये आणि टॅक्सीचे भाडे १९ रुपये करण्यात आले होते. त्यानंतर हकिम समितीच्या शिफारशीनुसार २0१३ च्या मे महिन्यात भाडेवाढ मिळावी म्हणून रिक्षा आणि टॅक्सी संघटनांकडून प्रयत्न करण्यात आले. मात्र २0१२ च्या आॅक्टोबर महिन्यात भाडेवाढ झाल्यावर नविन भाडेवाढीविरोधात ग्राहक संघटनेकडून न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र न्यायालयाने
दिलेल्या मंजुरीनंतर अखेर
आॅगस्ट २0१४ पासून रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. त्यानुसार रिक्षाचे भाडे १७ रुपये आणि टॅक्सीचे भाडे २१ रुपये झाले.
आता मे महिन्यातील पाच दिवस उलटल्यामुळे भाडेवाढीच्या मागणीसाठी रिक्षा-टॅक्सी संघटनांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. संघटनांकडून एक रुपया भाडेवाढ मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासंदर्भात अप्पर मुख्य सचिव (परिवहन) गौतम चॅटर्जी यांनी विचारले असता, भाडेवाढीविषयी ११ मे रोजी एमएमआरटीएची बैठक होणार असून रिक्षा-टॅक्सीच्या भाडेवाढीवर चर्चा होईल, असे चॅटर्जी म्हणाले.
एक रुपया भाडेवाढ मिळावी अशी आमची मागणी परिवहन विभागाकडे ही मागणी सादर केली आहे. एमएमआरटीएच्या बैठकीत यावर चर्चा होईल.
- ए.एल.क्वाड्रोस, (मुंबई टॅक्सीमेन्स युनियन-महासचिव)
रिक्षा भाडेवाढ एक रुपया मिळावी अशी मागणी आहे. एमएमआरटीएकडून यावर योग्य निर्णय होईल, अशी आमची अपेक्षा आहे.
- शशांक राव (मुंबई रिक्षामेन्स युनियन- महासचिव)
आॅगस्ट २0१४ पासून रिक्षा आणि टॅक्सी भाड्यात दोन रुपयांची वाढ करण्यात आली. तर यंदाही किमान एक रुपयाची वाढ करण्याची मागणी संघटनांनी केली आहे.