खड्ड्यांविरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन?
By Admin | Updated: September 22, 2014 00:38 IST2014-09-22T00:38:46+5:302014-09-22T00:38:46+5:30
शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रिक्षाचालकांची अवस्था आमदनी अठन्नी-खर्चा रुपीय्या होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष राजा पाटील यांनी केला आहे.

खड्ड्यांविरोधात रिक्षाचालकांचे आंदोलन?
उल्हासनगर : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रिक्षाचालकांची अवस्था आमदनी अठन्नी-खर्चा रुपीय्या होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आल्याचा आरोप संघटनेचे अध्यक्ष राजा पाटील यांनी केला आहे. नवरात्रीदरम्यान खड्डे भरण्याची मागणी करून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
उल्हासनगर महापालिका रस्ताबांधणीवर दरवर्षी ४० कोटींपेक्षा जास्त खर्च करूनही रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांतील जीवघेण्या खड्ड्यांमुळे वयोवृद्ध नागरिक रिक्षात बसत नसून रिक्षाच्या दुरुस्ती खर्चात तिप्पट वाढ झाली आहे. पालिकेने लवकर रस्त्यांतील खड्डे भरण्याची मागणी त्यांनी पालिका आयुक्ताकडे केली आहे.
तीन महिन्यांपूर्वी डांबरीकरण केलेले रस्ते खड्डेमय झाले असून सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यांची अवस्थाही डांबरी रस्त्यांसारखी झाली आहे. सिमेंटचे व डांबरीकरण झालेले रस्ते खड्डेमय झाल्याने पालिका बांधकाम विभाग व शहर अभियंता रमेश शिर्के वादाच्या भोवऱ्यात सापडले असून त्यांच्या चौकशीची मागणी होत आहे. शहरातील शहाड फाटक ते पालिका रस्ता, मोर्यानगरी ते व्हिनस चौक रस्ता, लालचक्की रस्ता, नेताजी चौक ते भाटिया चौक-कालीमाता चौक रस्ता, गणेशनगर रस्ता, गायकवाडपाड्यातील टँकर पॉइंट रस्ता, राधास्वामी सत्संग ते ओटी चौक रस्ता, विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन ते काजल पेट्रोलपंप रस्ता, भंगार गल्ली रस्ता यासह असंख्य रस्त्यांची दुरवस्था झाली आहे.