रिक्षाचालक वेठीस धरणार

By Admin | Updated: January 18, 2015 00:04 IST2015-01-18T00:04:23+5:302015-01-18T00:04:23+5:30

नागरिकांच्या सेवेसाठी कामोठेमध्ये सुरू करण्यात आलेल्या एनएमएमटीच्या बससेवेला रिक्षाचालक संघटनेने विरोध करण्यास सुरुवात केली आहे.

The rickshaw puller will carry on | रिक्षाचालक वेठीस धरणार

रिक्षाचालक वेठीस धरणार

नवी मुंबई : नागरिकांच्या सेवेसाठी कामोठेमध्ये सुरू करण्यात आलेल्या एनएमएमटीच्या बससेवेला रिक्षाचालक संघटनेने विरोध करण्यास सुरुवात केली आहे. बससेवा बंद पाडण्यासाठी तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे प्रवाशांना वेठीस धरणाऱ्या या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
नवी मुंबई, पनवेल परिसरामध्ये रिक्षाचालकांची मनमानी वाढली आहे. ऐरोली, एमआयडीसी, खारघर, कामोठे व इतर परिसरामध्ये मीटरप्रमाणे रिक्षा चालतच नाहीत. रिक्षाचालक ठरवतील तेवढे पैसे प्रवाशांना द्यावे लागत आहेत. कामोठे परिसरामध्ये बससेवा सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीनंतर एनएमएमटीने या परिसरात बससेवा सुरू केली. प्रवाशांचाही चांगला प्रतिसाद मिळाला. त्यामुळे फेऱ्या वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु या बससेवेला रिक्षाचालक - मालक संघटनेने विरोध सुरू केला आहे. या परिसरातील प्रकल्पग्रस्त नागरिक रिक्षा चालवतात. बससेवेमुळे त्यांच्या रोजगारावर परिणाम होत असून, त्यांच्यावर बेकारीची वेळ आल्याचे कारण सांगून बससेवेविरोधात आंदोलनचा निर्णय घेतला आहे.
प्रकल्पग्रस्त संघटनेने मानसरोवर स्टेशनसमोर २७ जानेवारीला आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यात माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, विवेकानंद पाटील, मनोहर भोईर, शाम म्हात्रे, बाळाराम पाटील, बबन पाटील, जगदीश गायकवाड, केसरीनाथ पाटील, अतुल पाटील हे नेते सहभागी होतील. यामुळे बससेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)

च्एनएमएमटीची बससेवा सुरू व्हावी, अशी प्रवाशांनी मागणी केली होती. बससेवेला चांगला प्रतिसादही मिळाला. बससेवा बंद झाली तर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होईल.
च्रिक्षा व्यवसायाला विरोध नाही, पण बससेवाही सुरूच राहिली पाहिजे, असे मत प्रवासी व्यक्त करीत आहेत. बससेवा बंद पाडू नये, अशी मागणी होत असून बससेवा सुरू असेल तर रिक्षाचालकही मीटरप्रमाणे योग्य भाडे घेतील, असेही मत काही प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

एनएमएमटीला बंदोबस्त लागेल
पोलिस प्रशासनाने बस सेवा सुरू राहिल अशी भुमीका घेतली आहे. कोणीही कायदा हातात घेवू नये. रिक्षा चालकांनी त्यांचा व्यवसाय करावा. बसेसही त्यांच्या मार्गावर धावतील. दोन्ही सेवा सुरू असतील तर प्रवाशांची गैरसोय होणार नाही असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

Web Title: The rickshaw puller will carry on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.