छोटा शकिलचा ‘तो’ हस्तक निघाला रिक्षाचालक
By Admin | Updated: May 11, 2015 02:14 IST2015-05-11T02:14:50+5:302015-05-11T02:14:50+5:30
अंधेरी परिसरातील एका व्यावसायिकाकडे छोटा शकिल टोळीचा हस्तक म्हणून फोन करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली.

छोटा शकिलचा ‘तो’ हस्तक निघाला रिक्षाचालक
मुंबई : अंधेरी परिसरातील एका व्यावसायिकाकडे छोटा शकिल टोळीचा हस्तक म्हणून फोन करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेने शुक्रवारी अटक केली. हा आरोपी याच परिसरातील रिक्षाचालक असून, तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याचा साथीदार शकिल अब्दुल रहमान शेख (४०) यालादेखील अटक केली होती.
गेल्या दोन महिन्यांपासून अंधेरी परिसरात राहणाऱ्या एका व्यवसायिकाला छोटा शकिल टोळीतील फईम मचमच याच्या नावाने जाकिर शेख याने फोन केला. त्याने या व्यावसायिकाला धमकावत अंधेरी परिसरात राहणाऱ्या शकिलला १ कोटी रुपयांची खंडणी देण्याचे सांगितले. याबाबत व्यवसायिकाने डी.एन. नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. डी.एन. नगर पोलिसांसह या गुन्ह्याचा समांंतर तपास गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडूनदेखील सुरू होता.
हा आरोपी बुधवारी जुहू परिसरात येणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली. त्यांनी तत्काळ या परिसरात सापळा रचून शकिलला अटक केली. त्याच्याकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने रिक्षाचालक जाकिरचे नाव सांगितले. त्यानुसार गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी शुक्रवारी त्याला अटक केली. त्यानेच या व्यावसायिकाला धमकावत त्याच्याकडून १ कोटी रुपये उकळण्याची योजना आखल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)