रिक्षा, व्हॅनचालकांकडून प्रवाशांची लूट
By Admin | Updated: January 9, 2015 22:47 IST2015-01-09T22:47:10+5:302015-01-09T22:47:10+5:30
मुंबई-नाशिक महामार्गावर नेहमी होणाऱ्या वाहतूककोंडीचा गैरफायदा घेत रिक्षाचालकांनी गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची लूट चालविली आहे.

रिक्षा, व्हॅनचालकांकडून प्रवाशांची लूट
भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर नेहमी होणाऱ्या वाहतूककोंडीचा गैरफायदा घेत रिक्षाचालकांनी गेल्या काही दिवसांपासून प्रवाशांची लूट चालविली आहे. भिवंडीकर प्रवाशांच्या होणाऱ्या लुटीबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
शहराबाहेर पडण्यास नागरिकांना रेल्वे मार्ग नसल्याने नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना आधी भिवंडी-कल्याण व भिवंडी-ठाणे प्रवास करून पुढे रेल्वे प्रवास करावा लागतो. या ठिकाणी पोहोचण्यासाठी एसटी बसची सेवा अपुरी पडते. ठाणे व कल्याण परिवहनच्या सेवादेखील बऱ्याच वेळा कोलमडतात. त्यामुळे अनेक प्रवाशांना खाजगी रिक्षा अथवा काळी पिवळी व्हॅन या वाहनांनी प्रवास करावा लागतो. गेल्या काही दिवसांपासून दुर्गाडी पूल व रांजणोली नाका या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. हा बहाणा करीत कल्याण, भिवंडी व ठाणे रिक्षा व व्हॅनचालकांनी प्रवासी भाड्यात मनमानी सुरू केली आहे.
कल्याण-भिवंडी रिक्षा ३० ते ५० रुपये आकारत आहे. तर ठाणे-भिवंडी रिक्षा व व्हॅन ५० रुपयांपेक्षा जास्त प्रवासी भाडे आकारत आहेत. हा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये अनेक रिक्षा व काही व्हॅन पासिंग न करता तसेच प्रवासी वाहतूक कायद्याचे पालन न करता वाहने चालवित आहे. त्याकडे शहर वाहतूक शाखा व प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. पेट्रोलचे दर कमी झाले असताना प्रवाशांची लूट थांबविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा व ही नागरिकांची आर्थिक लूट थांबवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून होत आहे. (प्रतिनिधी)
मनमानी भाडेआकारणी
४गेल्या काही दिवसांपासून दुर्गाडी पूल व रांजनोली नाका या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. हा बहाणा करीत कल्याण, भिवंडी व ठाणे रिक्षा व व्हॅनचालकांनी प्रवासी भाड्यात मनमानी सुरू केली आहे.